कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 05:35 AM2019-11-03T05:35:28+5:302019-11-03T05:35:56+5:30

कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं हा आक्षेप अधूनमधून घेतला जातो.

Anywhere you press a button, the vote falls on the lotus ... | कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं...

कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं...

Next

यदु जोशी

कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर बटण दाबलं तरी मत कमळावरच पडतं हा आक्षेप अधूनमधून घेतला जातो. त्यावर खुलासेही होतात. मात्र, राज्यातील वीसहून अधिक मतदारसंघ असे आहेत की जिथे लोकांनी कोणत्याही चिन्हावर मत दिलं तरी आमदार भाजप किंवा शिवसेनेचाच झाला. कुणालाही बिग ब्रेकिंग वाटेल आणि ती खरीदेखील आहे. या मतदारसंघांमध्ये लोकांनी अपक्ष/बंडखोर यांना भाजप-शिवसेनेविरुद्ध निवडून दिलं, पण निकालानंतर चार-पाच दिवसांतच ते वर्षा/मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी महायुतीला साथ देत असल्याचं जाहीर केलं. एका अर्थानं हे आमदार कमळ किंवा धनुष्यासोबत गेले. काही जण तर असे आहेत की ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढले अन् जिंकल्यावर महायुतीसोबत बसले. ही मतदारांशी प्रतारणा असल्याची टीका होऊ शकते, पण बहुतेक अपक्ष हे सत्तेच्या बाजूने जातात. मतदारसंघातील कामं काढायची म्हणून तसा निर्णय घेतल्याचं समर्थन करीत आमदार यू टर्न घेतात. मतदारांना तर गृहीत धरलेलंच असतं. प्रचारात एकमेकांशी पंगा घेणाऱ्या कार्यकर्त्यांची मग पंचाईत होते.

अमरावती में क्या हो रहा है!
भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तपस्वी नेते सुदामकाका देशमुख, राजकारणातील शालीन व्यक्तिमत्त्व आणि थोर रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचा जिल्हा म्हणून अमरावतीची ओळख आहे. या दिवंगत नेत्यांनी अमरावतीला राजकीय, सामाजिक संस्कार दिला. सध्या अमरावतीच्या राजकारणाला गुंडगिरीचं ग्रहण लागलं आहे. मस्तीखोरांचे कान धरू शकेल अशी अ‍ॅथॉरिटीही दिसत नाही. निवडणूक निकालानंतर एकेकाचा हिशेब करायचा म्हणून हाणामाºया सुरू आहेत. हनुमान व्यायामशाळेसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातील राजकारणीच सध्या आखाड्यात उतरले आहेत. बडनेºयाचे आमदार रवी राणा विरुद्ध भाजप-शिवसेना असा संघर्ष पेटलाय. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांचे नगरसेवक बंधू तुषार यांची गाडी फोडण्यात आली. शिवसेनेचे दिनेश बूब आणि राणा यांच्यात फ्री-स्टाईल झाली. निकालानंतर रवी राणा लगेच वर्षावर पोहोचले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. भाजपमधील स्थानिक कोणत्याही नेत्यापेक्षा ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत म्हणतात. पक्षातील केडरची माणसं मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करताहेत. मुख्यमंत्रीजी! मामा के शहर में ये क्या हो रहा है? राणांना टार्गेट करणाऱ्यांनी एका महिलेची (खा. नवनीत राणा) कोणत्या पातळीवर जाऊन बदनामी करायची याचं भानही ठेवलं तर बरं होईल.

गेला शेकाप कुणीकडे?
गेल्या विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचे तीन आमदार होते. या वेळी एक निवडून आले आणि त्यांनी लगेच भाजपला पाठिंबा दिला. नांदेड जिल्ह्यातील कंधारा-लोहा मतदारसंघातून माजी आयएएस अधिकारी श्यामसुंदर शिंदे शेकापच्या तिकिटावर जिंकले. नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे ते जावई. जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे ते भाजपसोबत गेले. शेकापचा बालेकिल्ला म्हणजे रायगड जिल्हा. तेथून पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. इतर ठिकाणचा खटारा केव्हाच मोडला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात स्वत:च्या भरवश्यावर वर्षानुवर्षे शेकापचं नाव टिकविणारे गणपतराव देशमुख या वेळी लढले नाहीत. त्यांचे नातू शेकापकडून लढले पण हरले. शेकाप आता आत्मचिंतन करेल, अशी अपेक्षा आहे.

गणपतरावांना सलाम
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात होती. पक्षाचे सगळे आमदार प्रचंड उत्साहात आले होते. तेवढ्यात एक गाडी आली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून विक्रमी दहा वेळा जिंकलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख गाडीतून उतरले. या वेळी ते लढले नाहीत. भाजपचा जल्लोष सुरू असताना या तपस्वीची कोणी दखल घेण्याचं काही कारण नव्हतं. विधानसभेत त्यांना काही काम होतं. ते आटोपून परत जाताना ते विधानसभेचा निरोप घेत असल्याचे भाव त्यांच्या डोळ्यात दिसले. ‘या वेळी नातवाला अपयश आलं हे खरंय, पण इतकी वर्षं मतदारांनी भरभरून यश दिलं त्यांचे आभारच मानायचे ना! माझी कुठलीही तक्रार नाही. मी कृतार्थ आहे’, हे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले. अध्यक्ष महाराज! असं म्हणत चांद्यापासून बांद्यापर्यंतचे प्रश्न मांडणारे, अनेक धोरणात्मक निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडणारे गणपतराव आता विधानसभेत नसतील. सभागृहात ते बसत त्या जागेकडे पत्रकार दीर्घेतून नजर गेली की चुकचुकल्यासारखे वाटत राहील.

Web Title: Anywhere you press a button, the vote falls on the lotus ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.