मुंबई - शिवसेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे आक्रमक पद्धतीने शिंदे गटावर आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. संजय राऊत तुरुंगात असताना अंधारे यांनी शिवसेनेची मशाल हाती घेत सत्ताधाऱ्यांवर आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ५० आमदारांना लक्ष्य केलं. तसेच, भाजप नेते किरीट सोमय्या, चित्रा वाघ आणि नारायण राणेंवरही त्यांनी प्रखर शब्दात टीका केली. त्यावरुन, राणेंनी शिवसेनेवर प्रहार केला आहे. आता, राणेंच्या टिकेला प्रत्युत्तर देताना तुमची दोन्ही मुले आगाऊ असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं.
सुषमा अंधारे यांनी नुकताच कोकण दौऱ्यावर केला. या दौऱ्यात त्यांनी राणे पिता पुत्रांवर जोरदार आसूड ओढले. अंधारेंनी केलेल्या टीकेला राणेंनी शनिवारी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंच्या सोबत आता राहिलंय कोण? सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांना माझ्या विरोधात बोलायला इथे आणलं. तिथेच शिवसेना संपली. माझ्या विरोधात बोलायला शिवसेनेत कुणीच राहिलं नाही... अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. यावेळी त्यांनी अंधारे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर, आता सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंसह राणे पुत्रांवरही टीका केली.
नारायणराव, आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही. माझा जो व्हिडिओ ते दाखवतात, तो व्हिडिओ जुना आहे. विचारांचं खंडन मंडन करावं लागतं, त्यांचा अभ्यास कमी आहे. मात्र, मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, अशा शब्दात अंधारेंनी राणेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहेत, एकाच पक्षाचे असल्यासारखे ते वागतात. एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. मात्र, काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणत त्यांनी बाबा रामदेव यांच्यावरुन निशाणा साधला. तसेच, रामदेव बाबा यांच्यासोबत अमृता वहिनी होत्या, त्या काहीही बोलल्या नाहीत. मी असते तर तिथेच खडसावले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही लोक स्वतंत्र मराठवाडा मागणी करत आहेत, त्यांची ही मागणी पूर्ण होणार नाही. ही भाजपची पिलावळ आहेत, असे म्हणत अंधारे यांनी गुणवंत सदावर्तेंना लक्ष्य केलं.