मुंबई वगळता राज्याला पावसाचा इशारा कायम
By admin | Published: May 24, 2016 03:17 AM2016-05-24T03:17:09+5:302016-05-24T03:17:09+5:30
आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात, अंदमान समुद्र व अंदमान द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात दाखल झालेला मॉन्सून सोमवारी स्थिर असतानाच हवामान खात्याने येत्या ७२ तासांसाठी
मुंबई : आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात, अंदमान समुद्र व अंदमान द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात दाखल झालेला मॉन्सून सोमवारी स्थिर असतानाच हवामान खात्याने येत्या ७२ तासांसाठी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे सोमवारीही मुंबईत ढगाळ वातावरण नोंदवण्यात आले. पुढील ४८ तास मुंबई व परिसरातील वातावरण ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २९ अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. शिवाय विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट होती. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत
व कोकण गोव्याच्या उर्वरित
भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरण सोमवारी सकाळीही ढगाळ होते. दुपारी मात्र कडक ऊन पडले होते. सूर्यास्तावेळी पुन्हा ढग दाटून आले. मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल नोंदवण्यात येत असतानाच आर्द्रतेमधील चढ-उतारामुळे उकाड्यात वाढ होत आहे.