- मनीषा म्हात्रेमुंबई : कोरोनाच्या काळात मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक लिलाधर पाटील हे आपल्या कर्तव्यासोबत स्पर्धा परीक्षांंची तयारी करत असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी आधारवड बनले आहेत. कोरोनाच्या काळात ते या तरुणांना ऑनलाइन व्याकरणाचे धडे देत आहेत.मुळचे जळगावचे रहिवासी असलेले पाटील हे २०१२ चे बँचचे पोलीस उपनिरीक्षक आहेत. सध्या ते मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. पाटील सांगतात, महाराष्ट्रातील एम.पी.एस.सी, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, तसेच अन्य सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी महत्त्वपूर्ण विषय असतो. ग्रामीण भागातील तरुणांना खासगी शिकवणी लावणे शक्य नसते. मी स्वतः ग्रामीण भागातून आलो असल्यामुळे सर्व परिस्थितीची मला जाणीव आहे. अशात त्या विद्यार्थ्याना मोफत मार्गदर्शन मिळाल्यास मदत होईल, म्हणून मी फक्त छोटासा प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात.कर्तव्य बजावून घरी आल्यानंतर अथवा सुट्टीच्या ते व्हिडीओ बानवून शेअर करत आहेत. त्यांनी युट्यूबवर लिलाधर पाटील नावाने चॅनेल सुरु केले आहे. त्यावरूनच ते या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच त्यांनी स्वतः एमपीएससीचे लेक्चरही घेतले असून त्यावर दोन पुस्तकेही लिहिलेली आहेत. गेल्या आठवड्याभरापासून त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरु आहेत. त्याला तरुणांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या काळात घरी असल्यामुळे सोशल मिडियावर वावर वाढला. त्यामुळे या प्लटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांंसाठी एपीआय देत आहेत व्याकरणाचे धडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 6:55 AM