एपीएमसीची बदनामी कर्मचाऱ्यांकडूनच !

By admin | Published: February 7, 2017 04:25 AM2017-02-07T04:25:00+5:302017-02-07T04:25:00+5:30

भाजीपाला, फळे, सुका मेवा, साखर व इतर महत्त्वाच्या वस्तू नियमनातून वगळल्याने बाजार समितीचे उत्पन्न घटले आहे. संस्थेचे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष देण्याऐवजी येथील

APMC's defamation staff only! | एपीएमसीची बदनामी कर्मचाऱ्यांकडूनच !

एपीएमसीची बदनामी कर्मचाऱ्यांकडूनच !

Next

नामदेव मोरे,  नवी मुंबई
भाजीपाला, फळे, सुका मेवा, साखर व इतर महत्त्वाच्या वस्तू नियमनातून वगळल्याने बाजार समितीचे उत्पन्न घटले आहे. संस्थेचे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष देण्याऐवजी येथील अधिकारी व कर्मचारी स्वत:चे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष देवू लागले आहेत. यातून एकमेकांची व परिणामी संस्थेची बदनामी करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. डॉग स्कॉड घोटाळ्यालाही हेच अर्थकारण जबाबदार असल्याची चर्चा मार्केट आवारामध्ये सुरू झाली आहे.
एफएसआयनंतर सुरक्षेसाठी तैनात केलेल्या डॉग स्कॉड घोटाळ्यामुळे बाजार समितीची प्रतिमा पुन्हा मलिन झाली आहे. कुंपणच शेत खात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हा घोटाळा का घडला व घडवून आणला याविषयी उघडपणे चर्चा सुरू झाल्या आहेत. सर्वच मार्केटमधील कर्मचारी, जकात नाक्याप्रमाणे सुरक्षा विभागामध्येही प्रत्येक मार्केटमधून पैसे वसूल करण्याची स्पर्धा सुरू आहे. गेटवरील प्रत्येक येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांकडून किमान पाच रुपये घेतल्याशिवाय एकही गाडी आतमध्ये सोडली जात नाही.
रोज रात्री मार्केटमध्ये वाहने उभी करू देण्यासाठी प्रतिवाहन ५० ते १०० रुपये वसूल केले जात आहेत. याशिवाय बांधकाम साहित्य, अनधिकृत फेरीवाले, अवैध व्यवसाय करणारे या सर्वांकडून पैसे वसूल केले जात आहेत. या वसुलीचा वाटा सुरक्षा रक्षकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात आहे.
मार्केटमधील अधिकारी व मुख्यालयातील वरिष्ठांमध्ये या वसुलीवरूनच वाद असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. कोणत्या अधिकाऱ्याचे कोणाशी भांडण आहे व कोणी परस्पर वसुलीसाठी स्वत:ची माणसे नेमली याची चर्चा अनेक महिन्यांपासूनच सुरू आहे. या वादातून काही जणांना जाणीवपूर्वक अडकविण्यासाठी डॉग स्कॉड घोटाळा घडवून आणला आहे.
बाजार समितीमध्ये पैशाच्या स्पर्धेतून फक्त सुरक्षा विभागातच भांडणे नाहीत. प्रत्येक मार्केटमध्ये अधूनमधून हा वाद होतच असतो. आंबा हंगामामध्ये मापाडी गेटवर वसुली करत असल्याचे चित्र उघडपणे पहावयास मिळते. प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर प्रकाश टाकल्यानंतर मापाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी कोण कोठून किती पैसे गोळा करतो याचा तपशीलच सांगू लागले होते.
फळ व भाजी मार्केटमध्ये अवैधपणे गुटखा व गांजा विक्री करणाऱ्यांकडूनही पैसे वसूल केले जातात. मसाला मार्केटमध्ये बदाम शेंगदाणा म्हणून दाखविला जात असल्याचे मत खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाषणांमधून व्यक्त केले होते. अवैध पैसे मिळविण्याच्या स्पर्धेतूनच अधिकारी व कर्मचारी संस्थेची बदनामी करत आहेत. गोपनीय कागदपत्रे आरटीआय कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांना दिली जात आहेत. संस्था टिकली नाही तरी चालेल, पण आमच्या दोन पिढ्यांचा उद्धार झाला पाहिजे या उद्देशाने सुरू असलेले कामकाज थांबविणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: APMC's defamation staff only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.