Join us  

एपीएमसीत बेकायदा सावकारी

By admin | Published: January 04, 2015 12:07 AM

कर्जदारांकडून भरमसाट व्याज आकारून पिळवणूक करणाऱ्या एका सावकाराविरोधात एपीएमसी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सुर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबईकर्जदारांकडून भरमसाट व्याज आकारून पिळवणूक करणाऱ्या एका सावकाराविरोधात एपीएमसी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. एक लाख रुपयाला प्रतिदिन ६०० रुपये व्याज अशी पठाणी वसुली या सावकाराकडून केली जात होती. विशेष म्हणजे या सावकाराकडे सुमारे पाच कोटींचे कर्जांचे बाँड, करारपत्रे आढळली. तर आणखी कोट्यवधींची उलाढालीची शक्यता आहे. महाराष्ट्र सावकारी कायद्या अंतर्गत एपीएमसी पोलिसांकडे हा गुन्हा दाखल झाला असून तपासाकरीता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. व्याजाचा धंदा चालवणाऱ्या शंकर नाडार (४७) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एपीएमसी मसाला मार्केट डी गल्लीत नाडारचे कार्यालय होते. जिल्हा निबंधक कार्यालयात यासंबंधीची तक्रार दाखल होताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने नाडरच्या कार्यालयावर छापा मारला. यावेळी तेथे ४ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जाच्या व्यवहाराचे बाँड आढळले. यावरून कोट्यवधी रुपयांच्या कर्जावर नाडारने भरमसाट व्याज आकारुन मोठी कमाई केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार नाडर याच्याविरोधात जिल्हा उपनिबंधक संतोष भिडवई यांनी तक्रार केली आहे.राजन राज यांनी व्यावसायासाठी नाडर याच्याकडून ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावर नाडर याने १ लाख रुपयाला प्रतिदिन ६०० रुपये व्याज दर लावला होता. त्याकरीता राज हे घेतलेल्या कर्जाचे प्रतिदिन ४२ हजार रुपये व्याज भरायचे. काही महिन्यांनंतर त्यांनी नाडर याला ८७ लाख रुपये देऊन कर्जाची परतफेड केली. मात्र व्याजदारानुसार नाडर याने त्यांच्याकडे अधिक १ कोटी रुपये मागितले. शिवाय व्याजाची रक्कम मिळवण्यासाठी त्यांना मानसिक त्रासही दिला. त्यामुळे राज यांनी नाडर विरोधात जिल्हा निबंधक कार्यालयात तक्रार केली. या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक संतोष भिडवई यांनी पोलिसांच्या मदतीने नाडर याच्या कार्यालयावर छापा टाकला. महाराष्ट्र सावकारी कायद्या अंतर्गत नाडर याच्याविरोधात तक्रार केल्याचे भिडवई यांनी सांगितले.