मुंबई : कोरोनाच्या काळात नागरिकांना पैशाची आत्यंतिक गरज होती. यावेळी बँकेच्या ग्राहकांना वेळेवर पैसे मिळणे गरजेचे होते. कोरोनाचे संकट ओढवले असतानाही अपना बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या खातेदारांना अविरत सेवा दिली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या कठीण काळातही सुट्टी न घेता रोकड देणे-घेणे, आरटीजीएस, एनइएफटी, एटीएम, मनी ट्रान्सफर, डेबिट कार्ड या सर्व माध्यमांतून ग्राहकांची सेवा केली. या काळात बँकेने १६ हजार कोटींचे व्यवहार केले, असे प्रतिपादन अपना बँकेचे दत्ताराम चाळके यांनी केले.
अपना बँकेच्या तळोजा शाखेचे स्थलांतर नुकतेच नावडे फेज-२ येथील नवीन सुशोभित वास्तूत करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कठीण काळातही बँकेच्या ठेवी वाढतच गेल्या. यावरून ग्राहकांचा अपना बँकेवरील विश्वास अधिक घट्ट होत गेला. सहकारी बँकांवर कितीही संकटे आली तरी जोपर्यंत ग्राहकांचा विश्वास या चळवळीवर आहे तोपर्यंत सहकारी बँकांची कायम भरभराटच होईल, असा विश्वास या वेळी चाळके यांनी व्यक्त केला.
अपना बँकेच्या तळोजा शाखेचे आता नावडे गावात स्थलांतर झाले असून येथील बँकिंग व्यवहाराची वाढती गरज लक्षात घेता येथील ग्राहकांना अद्ययावत सेवा मिळेल, असेही ते म्हणाले.
यावेळी स्थानिक नगरसेवक आणि बँकेचे जुने ग्राहक अरविंद म्हात्रे म्हणाले की, नावडे गावात सोयीसुविधा नसताना येथे अपना बँक सुरू झाली. कोरोना काळात सहकारी बँकांबद्दल लोकांच्या मनात शंका होती, परंतु अपना बँकेने आपुलकीची सेवा देऊन ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केला.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष अविनाश सरफरे, उपाध्यक्ष शांताराम दिवेकर, संचालिका मेघना चाळके व इतर मान्यवर उपस्थित होते.