Join us  

‘अपनी बात अपनों के साथ’ मोहीम ऑक्टोबरपासून 

By संतोष आंधळे | Published: September 26, 2022 11:37 PM

जमात-ए-इस्लामी हिंद, आर्चडायसेस ऑफ बॉम्बे, ब्रह्मकुमारी युवाशाखा आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी या मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले असून मुंबईतील विविध ठिकाणी वरील विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.

मुंबई : कोरोना काळानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आरोग्य क्षेत्रात अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रथमच विविध सामाजिक संस्था लहान मुलांमधील आरोग्याच्या मूलभूत समस्यांचे निराकारण करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. ‘अपनी बात अपनों के साथ’ असे या मोहिमेचे  नाव असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे.   

महाराष्ट्र फोरम - एक इंटर-फेथ अलायन्स (आंतरधर्मिय गट), युनिसेफ आणि सिटिझन्स असोसिएशन फॉरचाइल्ड राइट्स (सीएसीआर) यांनी किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्य, लसीकरण आणि किशोरवयीन मुलांमधील अ‍ॅनिमिया या विषयांवर एकत्रितपणे काम करणार आहे. जमात-ए-इस्लामी हिंद, आर्चडायसेस ऑफ बॉम्बे, ब्रह्मकुमारी युवाशाखा आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी या मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले असून मुंबईतील विविध ठिकाणी वरील विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.

प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे, नियमित लसीकरणामध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या, तसेच काही समुदायांमध्ये त्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया होती. एकूणच कुटुंबांमध्ये आरोग्यविषयाकडे दुर्लक्ष झाल्याने मुलांच्या आरोग्यवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. अशक्तपणा कोरोनाची साथ येण्यापूर्वीही हा प्रश्न होता तो अधिकच गंभीर झाला आहे. कोविड नंतरच्या काळात कौटुंबिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याने, वस्तू परवडत नसल्याने अनेक कुटुंबांनी अन्न/पोषक आहारात कपात केली आहे.

ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन जून २०२२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र फोरमच्या सदस्यांनी यासाठी काम करण्याचे ठरविले आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या मदतीसाठी आणखी काही व्यवस्था निर्माण करता येईल का यावरही त्यांनी भर देण्याचे ठरवले आहे. या कामासाठी फोरमच्या सदस्यांनी मानसिक आरोग्य, नियमित लसीकरण आणि किशोरवयीन मुलांमधील  अ‍ॅनिमिया व्यवस्थापन आणि प्रतिबंध हे विषय निवडले आहेत. 

याकरिता सामाजिक संस्थांनी मुंबईतील विविध परिसर वाटून घेतले आहेत, त्यामध्ये, ब्रह्मकुमारी संस्थे अंतर्गत सांताक्रूझ, वाकोला, जमात-ए-इस्लामी हिंद यांच्यामार्फत मोमीनपुरा आणि मदनपुरा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे गोरेगाव पूर्व आणि पश्चिम आणि आर्चडायस ऑफ बॉम्बे यांच्यातर्फे  वांद्रे आणि माहिम या परिसरांमध्ये स्वयंसेवकांच्या मदतीने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या स्वयंसेवकांना आरोग्य विषयांवर प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यानंतर ते नेमून दिलेल्या वस्तीतील घरांमध्ये जाऊन लोकांशी थेट संवाद साधतील. साधारण ३५,०००घरांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचे काम जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहील.

टॅग्स :आरोग्य