Join us

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील बदनामीकारक लेखाबद्दल माफीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:05 AM

२४ जानेवारी २०१६ या दिवशी साप्ताहिकाने लेख प्रसिद्ध केला होता. त्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पाच वर्षे न्यायालयीन संघर्ष केल्यानंतर सावरकर यांच्यावरील बदनामीकारक लेख छापणाऱ्या ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकाने माफी मागितली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी करणारा लेख प्रसिद्ध केल्यावरून ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकाने आपल्या ताज्या अंकामध्ये माफीनामा सादर केला आहे.

२४ जानेवारी २०१६ या दिवशी साप्ताहिकाने लेख प्रसिद्ध केला होता. त्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले. पाच वर्षांच्या संघर्षानंतर ‘द वीक’ या मासिकाच्या व्यवस्थापनाने माफी मागितली. या संबंधात प्रतिक्रिया व्यक्त करताना स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले की, मुळात या घटनेला हा विजय आहे असे म्हणणे अयोग्य आहे. आम्ही पाच वर्षे लढा दिला, मात्र अन्य कोणी याबाबत बोलत नाही. राष्ट्राचे मानदंड असणाऱ्या व्यक्तीबाबत बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध होतो आणि लोक संतापतात आणि दोन दिवसांमध्ये विसरतात, असे होता कामा नये.

ही काही व्यक्तिगत मानहानीची बाब नाही. २१ वेळा तारखा पडल्या. आता जेव्हा वॉरंट काढण्याची वेळ आली तेव्हा द वीकच्या व्यवस्थापनाला खटल्याचे आणि त्यामुळे होणाऱ्या शिक्षेचेही गांभीर्य लक्षात आले. त्यांनी आम्हाला संपर्क साधून ही बाब आधीच्या लोकांच्या काळात झाली आहे. आम्हाला माफी मागायची आहे, असे सांगितले. त्याचप्रमाणे ते एक लेख जी खरी बाजू आहे, ती ही छापणार आहेत, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयीन संघर्षासाठी कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी अथक काम केले होते.

माफीनामा : दिलगिरी व्यक्त

माफीनाम्यात ‘द वीक’ ने म्हटले आहे की, २४ जानेवारी २०१६ रोजी विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भातील एक लेख प्रसिद्ध केला गेला होता. हा लेख ‘लॅम्ब लायनाईझ्ड’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता. वीर सावरकर यांच्यासारख्या उच्च व्यक्तिमत्त्वाबद्दल चुकीचा अर्थ लावण्यात आला. आम्हाला वीर सावरकरांबद्दल नितांत आदर आहे. आम्ही छापलेल्या लेखामुळे कोणत्याही व्यक्ती दुखावल्या गेल्या असल्यास वा काही व्यक्तिगत हानी झाली असल्यास आम्ही व्यवस्थापन म्हणून खेद व्यक्त करतो. असा लेख छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत.

 

टॅग्स :विनायक दामोदर सावरकर