‘अपोफिस’ लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 04:54 AM2019-05-04T04:54:38+5:302019-05-04T04:54:53+5:30
दा.कृ.सोमण यांची माहिती : पृथ्वी जवळून जाणार; मात्र कोणताही धोका नाही
मुंबई : विश्वाचे गूढ पूर्णपणे उकलण्यास आधुनिक विज्ञानाला अद्यााप यश आले नसले, तरी खगोल विज्ञानातील प्रगतीमुळे भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचा अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. अशाच प्रकारच्या निरीक्षणातून सुमारे दहा वर्षांनंतर शुक्रवार, १३ एप्रिल, २०२९ रोजी पृथ्वीवर ‘अपोफिस’ नावाचा ३४० मीटर आकाराचा मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, हा लघुग्रह पृथ्वीवर न आदळता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ३१ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याचे, खगोलशास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड बिनझेल यांनी नुकतेच एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जाहीर केले. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी ही माहिती दिली. मात्र, तो पृथ्वीच्या जवळून जाणार असून, पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे सोमण यांनी नमूद केले.
‘अपोफिस’ हा लघुग्रह तीन शास्त्रज्ञांनी १९ जून, २००४ रोजी अमेरिकेतील किटपीक वेधशाळेतून शोधला. सुरुवातीपासूनच शास्त्रज्ञ त्याच्यावर नजर ठेवून होते. अधिक चैत्र कृष्ण अमावस्या, शुक्रवार, १३ एप्रिल, २०२९ हा दिवस त्या दृष्टीने मोठ्या ‘धोक्याचा
दिवस’ समजला जात होता. कारण हा लघुग्रह या दिवशी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तो धोका आता टळला आहे. यापुढे तो पृथ्वीपासून केवळ ३१ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याने, शास्त्रज्ञांना त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. या घटनेला अजून दहा वर्षे आहेत, तरी शास्त्रज्ञ आतापासूनच तयारीला लागले आहेत. १३ एप्रिल, २०२९ असा तो दिवस असून, त्या दिवशी पृथ्वीच्या काही भागांतून हा लघुग्रह साध्या डोळ्यांनीही पाहता येईल. शिवाय भविष्यात एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाली, तर अगोदरच एखादे यान त्याच्यावर आदळवून त्याचा मार्ग बदलता येईल किंवा लेझर किरणांचा त्यावर मारा करून पृथ्वीला सुरक्षित ठेवता येईल, असे मत शास्त्रज्ञांनी मांडले.
...तर शास्त्रज्ञ पृथ्वीला सुरक्षित ठेवतील
५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर आकाराचा वीस लाख टन वजनाचा एक अशनी पाषाण महाराष्ट्रात लोणार या ठिकाणी आदळला होता. आजही तेथे आपणास सुमारे दोन किलोमीटर व्यासाचे दीडशे मीटर खोल अशनी विवर पाहता येते, परंतु आता अंतराळ विज्ञानात खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे एखादा धूमकेतू किंवा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाल्यास, शास्त्रज्ञ पृथ्वीला नक्कीच सुरक्षित ठेवू शकतील. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.