Join us

अ‍ॅप बेस्ड टॅक्सी संपाची कोंडी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 6:03 AM

अ‍ॅप बेस्ड टॅक्सी कंपन्या आणि संघ यांच्यातील बैठकीत तोडगा निघत नसल्यामुळे मुंबईकरांना सलग दहाव्या दिवशी संपाचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई : अ‍ॅप बेस्ड टॅक्सी कंपन्या आणि संघ यांच्यातील बैठकीत तोडगा निघत नसल्यामुळे मुंबईकरांना सलग दहाव्या दिवशी संपाचा सामना करावा लागणार आहे. अ‍ॅप बेस टॅक्सी चालक-मालकांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नसल्यामुळे अ‍ॅप बेस्ड टॅक्सी संप कायम राहणार आहे.ओला-उबर व्यवस्थापनाकडून असमाधानकारक व्यवसाय मिळत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली संप सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत ओला-उबर व्यवस्थापनाने मान्य झालेल्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले नाही. यामुळे संपाबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू असून तूर्तास संप कायम असल्याचे कामगार संघाच्या आनंद कुटे यांनी सांगितले.तत्पूर्वी सोमवारी ओला-उबर व्यवस्थापन आणि संघाचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीनुसार, ओला-उबर व्यवस्थापनाने चालकांना प्रति किलोमीटर दरवाढीसह सुमारे ८० टक्के मागण्या मान्य केल्या. यात कमिशन वजा न करता प्रति किलोमीटरमागील दरात वाढ करण्यात आली आहे. शिवाय नव्याने लीज कॅब भाडेतत्त्वावर घेण्यात येणार नाही, रायडिंग टाइमसाठी प्रति किलोमीटर दीड रुपये देणे या आणि अशा अन्य मागण्या ओला-उबर व्यवस्थापनाने मान्य केल्या.संघाच्या प्रतिनिधींशी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत संपर्क साधला असता, संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू आहे. ओला-उबर व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य केल्याचे लेखी मिळेपर्यंत संप सुरू राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय कामगार संघाने दिली. ‘मुंबईकरांना सेवा देण्यासाठी आम्ही भागीदारांसह प्रयत्नशील आहोत. वाहन चालकांना योग्य उत्पन्न देण्याबरोबर अन्य मागण्यांच्या चर्चेसाठी तयार असून, चालकांना मदत करण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे उबर व्यवस्थापनाच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

टॅग्स :ओलाउबरसंप