Join us

अ‍ॅप बेस्ड टॅक्सींचा संप सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 5:47 AM

सोमवारपासून सुरू असलेला अ‍ॅप बेस्ड टॅक्सींचा संप सलग चौथ्या दिवशी अर्थात गुरुवारी कायम राहणार आहे.

मुंबई : सोमवारपासून सुरू असलेला अ‍ॅप बेस्ड टॅक्सींचा संप सलग चौथ्या दिवशी अर्थात गुरुवारी कायम राहणार आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी अ‍ॅप बेस्ड कंपन्यांनी एक हजार रुपये प्रति ट्रिप देण्याचे आश्वासन देत संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असून तिसºया दिवसअखेर सुमारे ९६ टक्के अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांनी संपात भाग घेतल्याचा दावा संघटनेने केला आहे.महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने पुकारलेल्या संपाला बहुतांशी अ‍ॅब बेस्ड टॅक्सी चालक-मालकांनी प्रतिसाद दिला आहे. ओला-उबर कंपनी मालकांनी मंगळवारी रात्रीपासून संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. संपात भाग घेतलेल्या चालक-मालकांच्या मोबाइल अ‍ॅपवर हजार रुपये प्रति ट्रिपचे आमिष दाखविले जात असून त्वरित कामावर रुजू होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे संघाचे ओला-उबर प्रतिनिधी अनंत कुटे यांनी सांगितले. ओला-उबर यांसारखे व्यवस्थापन अद्याप मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणतीही हालचाल करीत नसल्याने संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मुंबईकरांच्या त्रासाला बेजबाबदार ओला-उबर व्यवस्थापन आणि सरकार जबाबदार असल्याचे संघाचे म्हणणे आहे.वातानुकूलित अ‍ॅप बेस्ड टॅक्सी ठप्प असल्याने प्रवासी वातानुकूलित बस आणि मेट्रोसह रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. मूळ भाडे १०० ते १५० रुपये आणि प्रतिकिलोमीटर १८ ते २३ रुपये या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी बुधवारी संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह बैठक पार पडली. याचे निवेदन परिवहन मंत्री रावते यांना दिले होते. मात्र निवेदनानंतर कोणतीही कारवाई होत नसल्याने हा संप गुरुवारीदेखील कायम राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.>चौपट भाडे घेण्याची परवानगी आहे का?कामगारांच्या आर्थिक मागण्यांवर सरकारकडून परवानगी घेतली जाईल, असे ओला-उबरचे व्यवस्थापक यापूर्वी बोलत होते. मात्र संप काळात तुरळक असलेल्या आॅनलाइन वाहनांच्या ग्राहकांकडून कंपनी दुप्पट ते चौपट भाडे आकारत आहे. याबाबत सरकारकडून परवानगी घेतली आहे का, असा सवाल संघाचे सचिव सुनील बोरकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :टॅक्सी