अॅप बेस्ड टॅक्सी संप अजून दोन दिवस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:40 AM2018-10-26T05:40:14+5:302018-10-26T05:40:17+5:30
विविध मागण्यांसाठी सोमवारपासून संपावर गेलेल्या अॅप बेस्ड टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन दिवसांत बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले.
मुंबई : विविध मागण्यांसाठी सोमवारपासून संपावर गेलेल्या अॅप बेस्ड टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन दिवसांत बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार टॅक्सी चालकांनी व संघटनेने केला आहे.
अॅप बेस्ड टॅक्सी चालकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व संपात हस्तक्षेप करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संप पुकारलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासहित दिवाकर रावते यांची भेट घेतली त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
टॅक्सी चालक संपावर गेल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत असल्याने सरकारने या संपाची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. संपावर जाण्यापूर्वी चालकांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संप चिघळला आहे. व्यवस्थापनाकडून चालक व मालकांची आर्थिकदृष्ट्या पिळवणूक होत आहे. प्रवाशांकडून आकारले जाणारे भाडे आणि प्रत्यक्षात या चालक, मालकांना मिळणारे भाडे यात मोठी तफावत असल्याने त्यांच्यावर शेतकऱ्यांप्रमाणेच आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे मुंडे व अहिर यांनी परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
रावते यांनी या मागण्यांची
दखल घेत या प्रकरणात सरकार हस्तक्षेप करेल असे सांगितले. ही वाहने सिटी टॅक्सी म्हणून चालवण्याबाबत आदेश काढला आहे, मात्र न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असून, ही स्थगिती उठावी यासाठी परिवहन विभाग तातडीने दाद मागणार असल्याचे रावते यांनी सांगितले. या शिष्टमंडळात इंटक प्रणीत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते, सचिन बोरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
>‘त्या’ चालकाचा मृत्यू हृदयविकाराने
संप सुरू असताना घाटकोपर येथे उत्तम गारगोटे या चालकाचा मृत्यू झाल्याने चालकांमध्ये खळबळ उडाली होती. गारगोटे यांनी आत्महत्या केल्याची चालकांमध्ये चर्चा होती. मात्र, प्राथमिक शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, गारगोटे यांचा मृत्यू नैसर्गिक असून हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर निरगुडकर यांनी दिली.
>सानपाडा कार्यालयावर मोर्चा
भाडे वाढवून मिळावे व इतर मागण्यांसाठी ओला, उबेर टॅक्सी
चालक व मालकांनी गुरुवारी सानपाडा येथील ओलाच्या कार्यालयात जाऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे काही
वेळ तणावाचे वातावरण निर्माण
झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन आंदोलकांना शांत केले. यानंतर ओलाचे कार्यालय बंद करण्यात आले होते.