मुंबई : कोरोनावरील लस ही प्राधान्याने फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आराेग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात जिल्हा पातळीवर खासगी व सरकारी सेवेतील आराेग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व माहिती लवकरच राज्य शासन निर्मित एका विशेष ॲपमध्ये संकलित करण्यात येईल. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात हे ॲप येणार असून यात जिल्हा पातळीवरून माहिती अपलोड करण्यात येईल. या ॲपमध्ये लसीचा डोस, पुन्हा देण्यात येणारा डोस आणि लसीचे वेळापत्रक असेल. ॲपमध्ये संकलित करण्यात येणाऱ्या सर्व माहितीची उपलब्धता केंद्र सरकारकडेही असेल. ॲप अखेरच्या कोडिंग टप्प्यात आहे. लवकरच ते कार्यान्वित करण्यात येईल.