Join us

मालाडचे आप्पा पाडा पेटले! कुत्रेही हाेरपळले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:37 PM

मालाड पूर्व येथे आप्पापाडा हा डोंगराळ परिसर असून या डोंगरावर अनेक हजारो झोपड्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाडच्या आप्पा पाडा येथे आग लागण्याचे शुक्लकाष्ट काही थांबताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांत आप्पा पाड्यात सोमवारी तिसऱ्यांदा आग लागली. सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पाच कुत्र्यांचा होरपळून मृत्यू झाला तर सहा ते सात झोपड्या जळून खाक झाल्या. १३ जण जखमी झाले असून एकाला रुग्णालयात दाखल केले आहे.

मालाड पूर्व येथे आप्पापाडा हा डोंगराळ परिसर असून या डोंगरावर अनेक हजारो झोपड्या आहेत. मार्च महिन्यात आप्पा पाड्याच्या आनंदनगर, आंबेडकरनगरात आग लागल्याने या झोपड्या जळाल्या होत्या तसेच या दुर्घटनेत एकाचा मृत्यूही झाला होता. फेब्रुवारीत येथील जामऋषी नगरमध्ये आग लागली होती. त्या दुर्घटनेत १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आता पुन्हा सोमवारी मध्यरात्री अडीच वाजता आप्पा पाड्यात आग लागली. पूर्वी लागलेल्या आगीत राखरांगोळी झालेला संसार कसाबसा उभारला होता, मात्र, सोमवारी पुन्हा आग लागल्याने पाच ते सात झोपड्या जळाल्या. या आगीत संसार  उद्ध्वस्त झाल्याने येथील महिलांनी टाहो फोडला. 

लघू अग्निशमन केंद्र उभारा दाट लोकसंख्या असलेल्या या परिसरात लघु अग्निशमन केंद्र उभारावे, अशी मागणी माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केली असून या प्रकरणी सहायक आयुक्तांना पत्रही लिहिले आहे.   गोरेगाव ते मालाड पूर्व या भागात एकच अग्निशमन केंद्र आहे. त्यामुळे या परिसरात आग लागल्यास वाहन पोहोचण्यास बराच वेळ लागतो, असे पत्रात लिहीले असून शारदाबाई पवार उद्यानजवळ अग्निशमन केंद्राची विनंती केली आहे.