Appasaheb Dharmadhikari: आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘लोकमत’ने केला होता सन्मान; ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ सोहळ्यात दिला होता ‘गुरूमंत्र’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:52 PM2023-02-08T14:52:19+5:302023-02-08T14:54:15+5:30
लोकमत वृत्त समूहाकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
Appasaheb Dharmadhikari: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकमत वृत्त समूहानेही आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानित केले आहे. लोकमतच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. देशातील बऱ्याच व्यक्ती जात-पात, धर्म या गोष्टींमध्ये अडकलेली आहेत. त्यामुळेच सध्या देशामध्ये माणूस म्हणून जगणे कठीण झाले आहे. पण प्रत्येकाने आपला धर्म पाळला तर देश सुधारण्यास मदत होईल, असे मत ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले होते.
मी कोणी महाराज नाही. मी सर्वसामान्य माणूस
आरोग्य शिबीर, वृक्षारोपण व संवर्धन, स्मशानभूमी नूतनीकरण, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदी कामे धर्माधिकारी प्रतिष्ठान करत आहे. मी कोणी महाराज नाही. मी सर्वसामान्य माणूस असून चांगले विचार देण्याचे काम मी करतो. मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या माणसाचे कार्य काय, याची जाणीव मी करून देतो. आपण आपल्या अनुयायांना संत वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा सल्ला देतो. आपण ज्या देशात राहतो त्याचे ऋण फेडण्याकरिता काय केले पाहिजे ते सांगतो. द्वेष, परस्पर तिरस्कार अंत:करणातून काढून टाकणे, मतभेद दूर करणे हे महत्त्वाचे आहे, असे धर्माधिकारी यांनी नमूद केले होते.
राष्ट्र सुधारण्याकरिता आपला सहभाग काय, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा
राष्ट्र सुधारण्याकरिता आपला सहभाग काय, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सर्व शासनाने करावे ही अपेक्षा चुकीची आहे. राष्ट्र समृद्ध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. देशाला घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे मन चांगले असायला हवे. मनामध्ये चांगले विचार असायला हवेत. मनाला स्थिर करण्यासाठी चांगले विचार असणे महत्वाचे आहे. मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतो. आपण प्रत्येक जण अडचणींवर मात करायला शिकलो तर ते देशाच्या हिताचे असेल, असे धर्माधिकारी यांनी म्हटले होते.
दरम्यान, महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केले. रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"