लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शासकीय प्रौढ मुकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर या संस्थेत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी १० ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन केंद्राच्या अधीक्षक यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत असलेल्या शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत १६ ते ४५ वर्ष या वयोगटातील इयत्ता ६ वी (वरिष्ठ) उत्तीर्ण, कोणताही गंभीर आजार नसलेले व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान ४० टक्के कर्णबधिर असलेल्या मुलांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर सुतारकाम या एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये देण्यात येते.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य विनामूल्य पुरविण्यात येते. प्रवेश अर्जाचे वाटप कामकाजाचे दिवशी शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र, शांती भवन, निजधाम आश्रम समोर, तहसील कार्यालयाजवळ, गांधी रोड ५. उल्हासनगर या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. टपालाने अर्ज मागवावयाचे असल्यास वरील पत्त्यावर रु. १० चे पोस्टाचे तिकीट लावलेले व स्वतःचा संपूर्ण पत्ता असलेला (पिनकोडसह) लिफाफा पाठवावा. अर्ज व्यक्तिशः किंवा टपालाद्वारे दिले जाणार आहेत.