गणेश मंडपासाठी आॅफलाइन अर्जाचीही सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:27 AM2018-08-12T03:27:41+5:302018-08-12T03:27:54+5:30
गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी तत्काळ मिळावी यासाठी यंदापासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेबद्दल फारशी माहिती नसलेल्या मंडळांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने मंडळे हवालदिल झाली आहेत.
मुंबई - गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी तत्काळ मिळावी यासाठी यंदापासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेबद्दल फारशी माहिती नसलेल्या मंडळांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने मंडळे हवालदिल झाली आहेत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने अखेर महापालिका प्रशासनाने मंडळांचे लेखी अर्ज घेऊन त्याचे रूपांतर आॅनलाइन परवानगीमध्ये करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी सर्व सहायक व उपायुक्तांना दिले आहेत.
गणेशोत्सव मंडळांना प्रत्येक वर्षी मंडपासाठी महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, ही परवानही मिळण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे परवानगी न घेताच मंडप उभारण्यात येतात. ही गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने मंडळांच्या मागणीनुसार आॅनलाइन परवानगी देण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलीस, मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल अशा सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळतील, असा यामागचा उद्देश होता.
मंडळांना आॅनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले होते. तरीही परवानगी मिळण्यात दिरंगाई होत असल्याने मंडळांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे सर्व विभागांतील सहायक आयुक्त व उपायुक्तांना मंडळाकडून लेखी अर्ज घेऊन त्यांचे रूपांतर आॅनलाइनमध्ये करण्याचे आदेश सर्व अधिकारी वर्गास बजाविण्यात आले आहेत.