मुसळधार पावसाचा इशारा, काळजी घेण्याचे महापालिकेचे मुंबईकरांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:33 AM2017-09-18T06:33:43+5:302017-09-18T06:33:45+5:30
रविवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या असतानाच, येत्या ७२ तासांत उत्तर कोकणासह मुंबईत संततधारेसह मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.
मुंबई : रविवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या असतानाच, येत्या ७२ तासांत उत्तर कोकणासह मुंबईत संततधारेसह मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. परिणामी, मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे, तर दुसरीकडे हवामान विभागाने राज्याला दिलेला मुसळधार पावसाचाही इशाराही कायम आहे.
गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३३.८, ३२.२ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. पावसामुळे कमाल आणि किमान तापमानातही घट झाली असून, मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २३.८ अंश नोंदविण्यात आले आहे. तीन ठिकाणी बांधकामाचा भाग पडला असून, नऊ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत, तर नऊ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून, सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, मागील आठवड्याभरापासून मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी पावसाच्या दमदार सरी कोसळत असून, पावसाने वातावरणात गारवा आल्याने मुंबईकर सुखावले आहेत.
राज्यासाठी इशारा
१८-१९ सप्टेंबर :
कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
२० सप्टेंबर : कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
२१ सप्टेंबर : कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
>भरतीचे वेळापत्रक
दिनांक वेळ लाटा (उंची
मीटरमध्ये)
१८ सकाळी १०.४४ ४.३५
१८ रात्री ११.०२ ४.०७
१९ सकाळी ११.२५ ४.५०
१९ दुपारी १२.०३ ४.५४
१९ रात्री ११.४६ ४.२५
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.