लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात लागू असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे पाठविण्याचे आवाहन विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी केले.
सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक ५१ - भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ हे महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता हे विधेयक गृहमंत्री तथा समितीचे प्रमुख अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आले आहे. या विधेयकातील विषयांमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींकडून सुधारणा, सूचना मागविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. इच्छुकांनी १५ जानेवारीपर्यंत तीन प्रतींमध्ये आपल्या सूचना निवेदनाच्या स्वरूपात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे पाठवाव्यात. तसेच, al.assembly.mls@gmail.com या ईमेलवर सुधारणा आणि सूचना पाठविता येतील, असे आवाहन प्रसिद्धिपत्रकान्वये करण्यात आले आहे.