पालिका प्रशासन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून बंद असलेले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय अखेर येत्या सोमवारपासून मुंबईकरांसाठी खुले होणार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि पाच वर्षांखालील लहान मुलांनी प्राणिसंग्रहालयात येणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर १५ मार्च २०२० पासून रणीबाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. मात्र आता कोरोनाचा प्रसार मुंबईत पूर्णपणे आटोक्यात आला आहे. त्यामुळे राणीची बाग पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रस्ताव प्राणीसंग्रहालय संचालकांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे पाठवला होता. याबाबत तूर्तास कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याची तयारी प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने दाखविल्यानंतर आयुक्तांनी काही अटीसापेक्ष राणीबाग सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
* असे आहेत नियम
- प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य.
- वाहनधारकांनी प्रवेशद्वाराजवळ वाहनांची चाके निर्जंतुकीकरण फवारणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.
- संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि पाच वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्यावी.
- तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे. गर्दी करू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
- प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत कमी वस्तू आणाव्यात, खाद्यपदार्थ आणू नये.
-प्रवेशद्वाराजवळ हात निर्जंतुकीकरण करूनच उद्यानात यावे. समूहाने फिरू नये.
- प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.
- एकवेळ वापराचे (सिंगल यूज) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
- एकवेळ वापराच्या बॉटल प्राणिसंग्रहालयात आणू नयेत. त्याऐवजी प्रमाणित अथवा धातूच्या बाटल्या आणाव्यात. जेणेकरून कचरा टाळता येईल.
- प्रसाधनगृहाचा उपयोग केल्यानंतर तेथे लिक्विड सोपने हात स्वच्छ धुवावेत.
-मुख्य प्रवेशद्वाराजवळील पाणपक्ष्यांची प्रदर्शनी विशेष काळजी म्हणून तात्पुरती बंद असेल.