सरकार अफरोज शाह यांच्या पाठीशी, स्वच्छता मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 05:55 AM2017-11-24T05:55:35+5:302017-11-24T05:56:20+5:30
मुंबई : वर्सोवा किनारा स्वच्छता अभियानासाठी झटणारे अफरोज शाह आणि त्यांचे सहकारी स्वच्छ भारत अभियानाचेच काम करीत आहेत.
मुंबई : वर्सोवा किनारा स्वच्छता अभियानासाठी झटणारे अफरोज शाह आणि त्यांचे सहकारी स्वच्छ भारत अभियानाचेच काम करीत आहेत. या कामात अडथळा आणणा-यांची गय केली जाणार नसल्याचे सांगतानाच राज्य सरकार अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाºयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
अफरोज शाह व त्यांचे कार्यकर्ते ११० आठवड्यांपासून वर्सोवा किनाºयावर स्वच्छता मोहीम राबवत आहेत. मात्र, अलीकडेच परिसरातील गुंडांनी अफरोज आणि अन्य स्वच्छतादूतांना त्रास देत त्यांच्या कामात अडथळा आणला होता. शिवाय, चार महिन्यांपासून स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांनी वर्सोवा किनाºयावर एका ठिकाणी जमा करून ठेवलेला कचरा पालिकेने उचलला नव्हता. यामुळे मोहीम बंद करण्याचा निर्णय शाह आणि त्यांच्या सहकाºयांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह व अन्य स्वच्छतादूतांना गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी अफरोज यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच आपली मोहीम अशीच सुरू ठेवावी. सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही दिले. तुमचे काम शनिवारपासून पुन्हा सुरू करा. शासन तुमच्या पाठीशी आहे. धमकी देणाºयांची योग्य ती चौकशी करण्यात येईल. किनाºयावर जमा केलेला कचरा उचलण्याबाबत महापालिकेला निर्देश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. हे अभियान शनिवारपासून पुन्हा सुरू राहील, असे शाह यांनी सांगितले. दरम्यान, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही अफरोज शाह यांची भेट घेऊन स्वच्छता मोहीम चालू ठेवण्याचे आवाहन केले.