Join us  

जागतिक अंधदिनी डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन

By admin | Published: October 14, 2014 10:44 PM

विधानसभेसाठी महाराष्ट्रात बुधवार, १५ आॅक्टोबरला मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या अवघ्या चारच दिवसानंतर मतमोजणी होणार असून दिवाळीपूर्वीच राज्यात फटाक्यांची आतषबाजी होणार आहे

मोहोपाडा : विधानसभेसाठी महाराष्ट्रात बुधवार, १५ आॅक्टोबरला मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या अवघ्या चारच दिवसानंतर मतमोजणी होणार असून दिवाळीपूर्वीच राज्यात फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. मात्र, १५ आॅक्टोबर रोजी जागतिक अंध दिनही येत असल्याने या दिवशी तरी मतदारांनी डोळसपणे मतदान करून राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारे सरकार निवडावे असाच काहीसा संदेश अनेक ठिकाणी ऐकण्यास मिळत आहे.विधानसभा निवडणुकीतही तुम्ही मतदान कोणालाही करा, पण मतदानाचा भारतीय राज्यघटनेने दिलेला हक्क मात्र बजावा. मतदानाचा दिवस म्हणजे कुटुंबासमवेत एन्जॉय करण्याचा दिवस नसतो. मतदान हे प्रत्येकाने केले पाहिजे.उलट मतदान न करता सरकारला नावे ठेवणे, दोष देणे याला काहीही अर्थ नाही. मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे. त्यामुळे जागतिक अंध दिनादिवशी डोळे उघडे ठेवून डोळसपणे मतदान करावे. महाविद्यालयांमध्ये तरुण-तरुणींना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मतदार जनजागृती अभियान आकाशवाणीवरून आदी उपक्रमातून तरुणांमध्ये आपण मतदान केले पाहिजे, ही भावना जागृत करीत आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्येही जर आपण मतदान केले नाही तर, आपल्याला सरकारबद्दल बोलण्यास कोणताही अधिकार नसल्याची भावना तयार केली जात आहे. (वार्ताहर)