इन्स्टाग्रामवर अपील करून 'तिने' जमवले २४ हजार सॅनिटरी पॅड्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 09:40 PM2018-01-27T21:40:59+5:302018-01-27T21:41:08+5:30
एकीकडे अभिनेता अक्षय कुमार आपल्या पॅडमॅन सिनेमातून सॅनिटरी पॅडबद्दल जनजागृती करत असताना, दुसरीकडे वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर या गरजू महिलांसाठी महिन्याला मोफत सॅनेटरी पॅडचे वाटप करत आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- एकीकडे अभिनेता अक्षय कुमार आपल्या पॅडमॅन सिनेमातून सॅनिटरी पॅडबद्दल जनजागृती करत असताना, दुसरीकडे वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर या गरजू महिलांसाठी महिन्याला मोफत सॅनेटरी पॅडचे वाटप करत आहे.तर यासुविधाचा फायदा राज्यासह देशातील गरजू महिलांना होण्यासाठी त्यांनी देशातील पहिली डिजिटल सॅनेटरी पॅड बँक सुरू केली आहे.या त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गेल्या 20 जानेवारी रोजी राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
आता त्यांच्या या चळवळीला सहकार्य करण्यासाठी अनेक दाते पुढे येत आहेत.आज दुपारी त्यांच्या वर्सोवा स्वामी समर्थ नगर येथील कार्यालयात येऊन चक्क इंस्टाग्रामवर अपील करून ' जमवले २४ हजार सॅनिटरी पॅडस के. जे. सोमैय्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकत असणारी १८ वर्षीय भूमिका इसरानी हिने सुपूर्द करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
एक स्त्री तसेच वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे स्त्री आरोग्य आणि मासिक पाळीमध्ये उद्भवणारे आजार याबद्दल भूमिका अधिक जागरूक आहे. बोरिवलीमध्ये राहणारी भूमिका मित्र मैत्रिणींबरोबर फिरत असताना तिचे लक्ष वेधले ते आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या ' ती फाऊंडेशन ' च्या पोस्टरने. देशातील पहिली डिजिटल सॅनिटरी बँक चालवणाऱ्या आमदार डॉ. भारती लव्हेकर आणि त्यांच्या 'ती फाऊंडेशन' विषयीच्या उत्सुकतेपोटी तिने याबद्दलची सगळी माहिती मिळवली आणि या सामाजिक चळवळीत आपणही खारीचा वाटा उचलावा या ध्यासाने झपाटलेल्या भूमिकाने 'इंस्टाग्राम' वर सॅनिटरी पॅड डोनेट करण्याचे आवाहन केले. शे -दोनशे नव्हे तर तिने चक्क २४ हजार सॅनिटरी पॅड देऊन सामाजिक दायित्व जपले आहे.
भूमिकाच्या या निर्णयाला तिचे बाबा सुनील इसरानी यांनी भक्कम पाठिंबा दिला. " जर तुला इतरांनी मदत केली नाही तरी तू खचून जाऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं सांगत सुनील इसरानी यांनी तिला सॅनिटरी पॅड्स विकत घेण्यासाठी पैसे दिले. इतकंच नाही तर आपल्या मित्रांनाही तिने तयार केलेला अपीलचा मेसेज फॉरवर्ड करत आणखीन मदत देऊ केली. भूमिका सांगते मला मागील दोन दिवसांत १ हजारांच्यावर पॅड्स डोनेशन म्हणून मिळाले आहेत. या मदत करणाऱ्यांमध्ये अगदी १० रुपयांपासून अगदी ४ हजार रुपये मला पेटीएमने देणारेही अनेक जणं होते, ज्यांना मी ओळखतही नाही. मात्र मी या सगळ्यांची फार ऋणी आहे." भारती लव्हेकर म्हणाल्या कि, " आज माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे कारण माझ्या या मोहिमेला दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद लाभत असून ज्या गरजू महिलांना मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड परवडत नाही त्या महिलांपर्यंत आम्ही अधिक चांगल्याप्रकारे ही मदत पोहोचवू शकतो."
भूमिका प्रमाणेच मीरा रोडमध्ये राहणारी राजवी आणि केतन बलसारा यांनीही १ हजार २०० पॅड्स डोनेट केले आहेत. राजवी यांनी डॉ. भारती लव्हेकर यांच्या ' ती फाऊंडेशन' अंतर्गत होणाऱ्या सॅनिटरी पॅड बँकेची शॉर्ट फिल्म पहिली आणि त्यांच्या या कामात सहभागी व्हायचा निर्णय घेतला. दर महिन्याला एखाद्या सामाजिक कामासाठी हे दांपत्य मदत करत असते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून व्यावसायिक कामामुळे त्यांना समाजकार्य करणे शक्य होत नव्हते. अखेर २६ जानेवारीमुळे लागोपाठ सुट्ट्या येऊनसुद्धा त्यांनी ह्या सामाजिक कामासाठी वेळ काढला. " सामाजिक भान जपणाऱ्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांचे काम फारच दाखल घेण्याजोगे असून त्यांच्यामुळे आमचा हा विकेण्डला अधिकच मेमोरेबल झालाय असे केतन बालसारा यांनी सांगितले.