शर्जील उस्मानीला काेर्टाचे निर्देश, पुणे पोलिसांपुढे हजर रहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:08 AM2021-03-10T05:08:24+5:302021-03-10T05:09:02+5:30
एल्गार परिषद; उस्मानीला काेर्टाचे निर्देश
मुंबई : एल्गार परिषदेत केलेल्या भाषणासंबंधी नोंदविलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांपुढे हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानी याला मंगळवारी दिले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने पुणे पोलिसांना उस्मानीवर १६ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले. उस्मानीने गुन्हा रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने याच दिवशी पुढील सुनावणी ठेवली. उस्मानीतर्फे ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी सांगितले की, पोलिसांनी समन्स बजावून बुधवारी चौकशीसा हजर राहायला सांगितले. पोलीस ठाण्यात जायला ताे तयार आहे. मात्र, त्याला अटक करू नये. त्यावर न्यायालयाने उस्मानीला बुधवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे, तर पोलिसांना कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले.
उस्मानीविरोधात २ फेब्रुवारी रोजी पुणे येथील स्वारगेट पोलीस ठाण्यात आयपीसी कलम १५३ (ए) (धर्म, वर्ण व ठिकाण यावरून भिन्न गटांत शत्रुत्व निर्माण करणे)अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव व एबीव्हीपीचे माजी सदस्य प्रदीप गावडे यांनी त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, उस्मानीने हिंदू समाज, भारतीय न्यायव्यवस्था आणि लोकसभेबाबत आक्षेपार्ह भाष्य केले.
उस्मानीने सर्व आरोप फेटाळले. ३० जानेवारी २०२१ रोजी पुण्यात कोरेगाव-भीमा लढाईच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शांततापूर्ण मेळाव्यात मी भाषण केले. भाषण करण्यापूर्वी किंवा नंतर घटनास्थळावर असंतोष किंवा हिंसाचार झाला नाही. समाजातील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी आणि फौजदारी न्यायव्यवस्थेचा ससेमिरा पाठी लावून खुलेपणाने व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर आळा घालण्यासाठी असे गुन्हे नोंदविण्यात येतात. केवळ लोकांना समस्या समजावी, यासाठी काही कठोर शब्द वापरले, असे उस्मानीने याचिकेत नमूद केले आहे.