Join us

रांगांतून घडले माणुसकीचे दर्शन

By admin | Published: November 15, 2016 5:03 AM

पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर लागलेल्या रांगांना मुंबईकरांकडून माणुसकीचे दर्शन घडते आहे. तासन्तास ताटकळत उभ्या

मुंबई : पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर लागलेल्या रांगांना मुंबईकरांकडून माणुसकीचे दर्शन घडते आहे. तासन्तास ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्यासाठी राजकीय पक्षांसह सामाजिक सेवाभावी संस्थांतर्फे पाणी, बिस्किट, चहा आणि ताक या पदार्थांचे मोफत वाटप केले जात असून, या माणुसकीने मुंबईकरांच्या उदार मनाची प्रचिती ठिकठिकाणी येत आहे.मुंबई शहरासह उपनगरातील सर्वच बँकांसमोर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी पाच दिवसांपासून भल्यामोठ्या रांगा लागत आहेत. एटीएमसमोरील रांगांचीही हीच अवस्था असून, या रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून महिलावर्गाचा समावेश असतो. विशेषत: बँका सकाळी खुल्या होण्यापासून बंद होईपर्यंत वाढत्या राहत असून, काही ठिकाणी तर लोक मध्यरात्रीपासून रांगा लावत असल्याचे चित्र आहे. अशा सर्वांनाच दिलासा देण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक ईश्वर तायडे यांनी चांदिवली येथे, आमदार सुनील प्रभू यांनी पश्चिम उपनगरात, चांदिवली आणि साकीनाका येथे आमदार नसीम खान, सामाजिक कार्यकर्ते दीपक मेस्त्री, वरळी आणि कुर्ला येथे शिवसेनेसह काँग्रेस कार्यकर्ते अशा सर्वांकडूनच माणुसकीचे दर्शन घडवले जात आहे. दरम्यान, नोटा बदलण्यासाठी आता २४ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही बँकांसमोर लागणाऱ्या रांगांना दिलासा देण्यासाठी सामाजिक सेवाभावी संस्थांसह राजकीय पक्षांनी आपले कार्य सुरूच ठेवण्याचे ठरवल्याने रांगांचा दिलासा सध्यातरी कायम राहणार असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)