संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दादरमधील चित्रा सिनेमागृह रसिकांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर मराठी सिनेमांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे लालबागमधील ‘भारतमाता’ सिनेमागृहही कात टाकणार आहे. सध्या भारतमाताच्या नूतनीकरणाचे काम वेगात सुरू असून, गणेशोत्सवापर्यंत हे सिनेमागृह रसिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे संकेत भारतमाताचे व्यवस्थापकीय भागीदार कपिल भोपटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत.
बऱ्याच विक्रमी मराठी चित्रपटांचे प्रीमियर, सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली सोहळ्यांची साक्ष देत उभे असलेले भारतमाता सिनेमागृह कोरोनापूर्वीपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सिनेमागृहाच्या नूतनीकरणासोबतच सिनेमागृह चालविण्यासाठी लागणाऱ्या १६ लायसन्सचे काम सुरू आहे. भारतमाता सिनेमागृह ही हेरिटेज वास्तू असल्याने सर्व गोष्टींचा विचार करून हेरिटेज वास्तूंच्या नियमांनुसारच काम सुरू आहे.
हे थिएटर सिंगल स्क्रीनच राहणार आहे. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. स्क्रीन, प्रोजेक्टर, खुर्च्या, साऊंड सिस्टीम पूर्णत: बदलण्यात येणार असून, अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणेने सुसज्ज असे सिनेमागृह रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.
सिंगल स्क्रीनच्या दरात मल्टिप्लेक्सची मजा...
खुर्च्या, इतर सुविधा मल्टिप्लेक्ससारख्या असतील. तिकिटांचे दर मात्र मल्टिप्लेक्ससारखे नसतील, तर रसिकांच्या खिशाला परवडतील, असेच राहतील.
बंदच्या काळातही नेटके व्यवस्थापन
पूर्वी भारतमातामध्ये १५ कामगार होते. यापैकी कोरोनाच्या काळात एकजण दगावला. आता सात कामगार उरले आहेत. सिनेमागृहाचे संपूर्ण कामकाज ठप्प असतानाही कामगारांच्या पगारासह इतर खर्च सांभाळून नूतनीकरणाचे काम सुरू आहे.
भारतमाता सिनेमागृह कधी सुरू होणार, याची उत्सुकता रसिकांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सर्वांनाच आहे. सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत, पण ही वास्तू खूप जुनी असल्याने पाया मजबूत करण्यासाठी जास्त वेळ लागला. हेरिटेज स्ट्रक्चर असल्याने काही गोष्टी रिक्रिएट केल्या जात असल्याने वेळ लागत आहे. - कपिल भोपटकर, व्यवस्थापकीय भागीदार, भारतमाता