नोकरीचा अर्ज तरुणीला पडला ३ लाखांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:15 AM2018-03-03T02:15:02+5:302018-03-03T02:15:02+5:30
बँकेत नोकरी करण्यासाठी केलेला १०० रुपयांचा अर्ज एका तरुणीला ३ लाखांना पडल्याची घटना दादरमध्ये घडली.
मुंबई : बँकेत नोकरी करण्यासाठी केलेला १०० रुपयांचा अर्ज एका तरुणीला ३ लाखांना पडल्याची घटना दादरमध्ये घडली. प्रज्ञा अरुण घेगडमल असे तिचे नाव आहे. तरुणीच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, अधिक तपास सुरू केला आहे.
२७ फेब्रुवारी रोजी तिला पूजा नावाच्या महिलेने कॉल केला आणि एचडीएफसी बँकेत कर्मचारी भरती सुरू असल्याची माहिती दिली. घेगडमलनेही नोकरीसाठी तयारी दाखविली. त्या महिलेने व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवून अर्ज भरण्यास सांगितला. फॉर्म भरून झाल्यानंतर, ‘मेक पेमेंट’ असा पर्याय ओपन झाला. तिने शुल्कापोटी १०० रुपये भरले. मात्र, तिला व्यवहार रद्द झाल्याचे दाखविले. त्याच वेळी एकापाठोपाठ एक असे एकूण ९ ओटीपी क्रमांक तिच्या मोबाइलवर आले. तिने ते त्या पाठविलेल्या लिंकमध्ये भरले. तिला संशय आल्याने जवळच्या बँकेत धाव घेतली. तेथे विचारणा केली असता, नोकर भरती सुरू नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान तिच्या खात्यातून ३ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला.