आर्थिक मदतीसाठी १ लाख ६५ हजार रिक्षाचालकांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:04+5:302021-06-01T04:06:04+5:30
परिवहन विभाग; ५७ हजार खात्यात रक्कम पाठविण्याची प्रक्रिया सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना ...
परिवहन विभाग; ५७ हजार खात्यात रक्कम पाठविण्याची प्रक्रिया सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या आर्थिक मदतीसाठी २२ मेपासून रिक्षाचालक ऑनलाइन अर्ज करत असून सोमवारपर्यंत १ लाख ६५ हजार ९१ अर्ज आले आहे. त्यापैकी ५७ हजार अर्जदारांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, आधारकार्ड, वाहन परवाना, बॅंक खाते यांच्या नावात काही बदल असल्यास केवळ अशाच अर्जांची आरटीओ स्तरावर पडताळणी करण्यात येत आहे. १ लाख ६५ हजार ९१ अर्ज आले आहेत. त्यापैकी ५७ हजार अर्जांची पडताळणी झाली आहे. पैसे अर्जदारांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी हे अर्ज पाठविण्यात आले आहेत. अर्जदारांना एसएमएसच्या माध्यमाने अर्ज मंजूर झाली की फेटाळण्यात आला, याची माहिती मिळेल. अर्ज फेटाळण्यात आलेल्या रिक्षाचालकांनी पुन्हा अर्ज करावा किंवा स्थानिक आरटीओमध्ये संपर्क साधावा, असे परिवहन आयुक्तालयाने स्पष्ट केले.
.....................................