नोकरीसाठी ३० रुपयांचा अर्ज पडला १ लाखाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:03 AM2019-04-24T06:03:38+5:302019-04-24T06:03:41+5:30
बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबई : नवीन नोकरीच्या शोधात असताना एमबीए झालेल्या तरुणीने ऑनलाइन अर्ज केला. त्या अर्जासाठी तिला ३० रुपये भरण्यास सांगण्यात आले. मात्र, हेच ३० रुपये भरताना १ लाख १० हजार रुपये गमाविण्याची वेळ तिच्यावर आली. या प्रकरणी तिने बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पालघरची रहिवासी असलेली करिश्मा पाटील (२३) ही बोरीवलीत नोकरीसाठी येत असे. मात्र, पालघर ते बोरीवली प्रवास दगदगीचा होत असल्याने, तिने एका ठिकाणी आॅनलाइन बायोडाटा पाठविला. शुक्रवारी तिला फोन आला व नोकरीच्या अर्जासाठी ३० रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. तिने पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर, शनिवारी पुन्हा तिला फोन आला. फोन करणाऱ्या पूजा अग्रवालने करिश्माशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यामुळे केवळ ३० रुपयांसाठी चांगली नोकरी हातची जाऊ नये, म्हणून करिश्माने पैसे भरण्याची तयारी दाखविली.
अर्जासाठी पैसे देण्यास करिश्मा तयार झाल्याचे लक्षात येताच पूजाने करिश्माकडे तिचा बँक खाते क्रमांक व अन्य काही माहिती मागितली. तिने ती देताच थोड्या वेळाने तुझ्या मोबाइलवर ओटीपी नंबर येईल तो दे, असे पूजाने सांगितले. करिश्माने ओटीपी नंबर दिल्यानंतर काही क्षणांतच तिच्या बँक खात्यातून सुरुवातीला ३ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यानंतर, पुन्हा १ लाख ७ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. तिने पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, करिश्माने बोरीवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, बोरीवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.