Join us

म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील गाळ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 1:12 AM

सभापतींनी केला शुभारंभ; १६ जुलैपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज

मुंबई : पुनर्विकासानंतर घरापासून वंचित राहिलेल्या किंवा पुनर्विकास शक्य नसलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांची बृहत सूची (मास्टर लिस्ट) तयार करून, त्यांचे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे (आरआर) पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये समाविष्ट होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन म्हाडामार्फत करण्यात आले आहे. या प्रक्रियेला सोमवारी आर. आर. मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी सेवाशुल्क जमा करणे, बिलिंग आणि निविदा प्रक्रिया या सेवाही लवकरच ऑनलाइन करण्यात येणार असल्याचे घोसाळकर यांनी जाहीर केले.मास्टर लिस्ट तयार करण्यासाठी म्हाडाने खास सॉफ्टवेअर तयार केले असून म्हाडाने ऑनलाइन अर्ज मागविले आहे. १७ जून सकाळी दहा वाजल्यापासून या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. १६ जुलै रात्री ११.५९ वाजेपर्यंत भाडेकरूंना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जदारांची नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती म्हाडाने आपल्या संकेतस्थळवर उपलब्ध करून दिली आहे.अर्ज करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत, तसेच त्या निकालावर अपिलासाठी आणि त्या अपिलाच्या सुनावणीवर अंतिम निर्णय होईपर्यंतची बृहत सूचीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होण्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविली जात असल्याचे सभापतींनी सांगितले. म्हाडा मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, वित्त नियंत्रक विकास देसाई, सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे, तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, संगणक कक्षाच्या अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते.एसएमएसद्वारे मिळणार माहितीया प्रक्रियेमुळे बृहत सूची प्रकरणांच्या बाबतीत अचूक आणि कालबद्ध निर्णय देणे शक्य होणार आहे. बृहत सूचीसाठी यापूर्वी आॅफ लाइन पद्धतीने अर्ज केलेल्या, परंतु पात्रता निश्चिती न झालेल्या भाडेकरूंनी या नवीन प्रक्रियेंतर्गत आॅनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले, तसेच आॅनलाइन अर्ज केल्यानंतर भाडेकरूंना आपल्या नस्तीवर विविध टप्प्यांवर होत असलेली कार्यवाही एसएमएस आणि ईमेलद्वारे पुरविण्यात येणार आहे. या कामी नागरिकांना साहाय्य करण्यासाठी म्हाडा भवनातील मित्र कक्षात सेवा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, असेही ते याप्रसंगी म्हणाले.

टॅग्स :म्हाडा