मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या आर्थिक मदतीसाठी २२ मेपासून ऑनलाईन अर्ज करण्यात येत असून सोमवारपर्यंत २२ हजार अर्ज आले आहे. येत्या दोन दिवसांत अर्जदारांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास परिवहन आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत २२०४८ जणांचे अर्ज आले आहेत. पहिल्या दिवशी अर्थात शनिवारी संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची मोठी होती मात्र केवळ ४०० रिक्षाचालकांनी अर्ज केले. रविवारी दिवसभर सर्व्हर डाऊन आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे कमी अर्ज दाखल झाले. सोमवार दुपारपर्यंत ११ हजार आणि सायंकाळपर्यंत एकूण २२ हजार अर्ज आले.
आधारकार्ड, वाहन परवाना, बँक खाते यांच्या नावात काही बदल असल्यास केवळ अशाच अर्जांची आरटीओ स्तरावर पडताळणी होईल. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे अर्ज ऑनलाइन यंत्रणेतूनच पडताळणी होणार आहे. येत्या दोन दिवसात पैसे अर्जदारांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार असून यासाठी आयसीआयसीआय बॅंकेची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जदारांना एसएमएसच्या माध्यमाने अर्ज मंजूर झाली की फेटाळण्यात आला याची माहिती मिळेल. अर्ज फेटाळण्यात आलेल्या रिक्षाचालकांनी पुन्हा अर्ज करावा किंवा स्थानिक आरटीओमध्ये संपर्क साधावा, असे परिवहन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.
दुरुस्तीनंतर सर्व्हर पुन्हा सुरू
राज्यातील लाखो रिक्षाचालकांनी एकाच वेळी अर्ज भरण्याचा प्रयत्न केल्याने रविवारी बंद पडलेल्या सर्व्हरची दुरुस्ती केल्यानंतर सोमवारी ते सुरू करण्यात आले. महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर भेट देणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते. परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य ही वेबलिंक सुरू केल्यानंतर भेट देणाऱ्यांच्या संख्येत लाखोंनी वाढ झाली. रविवारी रात्री उशिरा पर्यंत संकेतस्थळाची क्षमता वाढवणे, जागा वाढवणे अशा तांत्रिक बाजूंवर काम करण्यात आले. सोमवारी मदतीची लिंक बिनदिक्कतपणे काम करू लागली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.