लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक स्थगित केल्याने विद्यार्थी संघटनांमध्ये आधीच संतापाचे वातावरण आहे. त्यातच नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज छाननीचा दिवस असल्यामुळे ठाकरे गटाच्या युवासेनेचे सर्व १० उमेदवार मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात दाखल झाले. उमेदवारी अर्जांची छाननी करण्यासाठी त्यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी उपकुलसचिव विकास डवरे यांच्या कार्यालयाला घेराव घेतला.
९ ऑगस्टला सिनेट निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली होती. पण, अवघ्या दहा दिवसांतच निवडणुका स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. स्थगितीनंतरही शेवटच्या दिवशी अनामत रक्कम घेऊन उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आले होते. मग नियोजित वेळापत्रकाप्रमाणे अर्जांची छाननी का केली जात नाही, असा प्रश्न युवा सेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
१७ला स्थगिती मग १८ला अर्ज स्वीकारले कसे?
नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी ठाकरे गटाच्या युवासेनेच्या दहापैकी दहा उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात नामनिर्देशन अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने अनामत रक्कम देऊन जमा केले होते. त्यामुळे नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला स्थगिती असताना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अखेर कुलगुरूंनी निवेदन स्वीकारले
युवासेना सदस्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर कुलगुरूंनी अखेर सोमवारी रात्री युवासेना सदस्यांचे निवेदन स्वीकारले. दरम्यान निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचे सबळ कारण विद्यापीठ प्रशासनाने द्यावे आणि बाजू मांडावी अशी मागणी त्यांनी केली आहे.