मुंबई : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी तब्बल तीन लाख ६६ हजार ५४० अर्ज आले आहेत. मुंबई विभागात उपलब्ध असलेल्या ६ हजार ५६९ जागांसाठी तिप्पट म्हणजेच १८ हजार ४९० अर्ज आले आहेत. या जागांवरील प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन नावनोंदणी करण्याची प्रक्रिया २५ मार्च रोजी पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रवेशासाठीची सोडत काढून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी तब्बल तीन लाख ६६ हजार ५४० अर्ज आले आहेत. पालकांना अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षण संचालनालायकडून मुदतवाढही दिली होती.
प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा अर्जाच्या सोडतीचा
आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात अर्जाची सोडत काढण्यात येईल. या सोडतीत निवड झालेल्यांना त्यांचा अर्ज भरताना दिलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळा उपलब्ध करून देण्यात येतील. संबंधित निवड झालेल्या बालकाच्या शाळा प्रवेशासाठी ठरावीक कालावधी देण्यात येणार आहे.
असा घ्या प्रवेश
- ‘प्रवेशासाठी निवड झाली’ असा एसएमएस येईल
- त्यानंतर आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी
- प्रवेश मिळाल्याचा संदेश आल्यावर ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी
- ॲलॉटमेंट लेटरवर पडताळणी समितीचा पत्ता असेल, त्याठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी
- त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावी.