मुंबई : मुंबईत बस्तान बसविलेल्या बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आसामप्रमाणेच मुंबईतही राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा कायदा (एनआरसी) लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मनसेपाठोपाठ आता भाजपा आमदार राज पुरोहित यांनी मुंबईसह देशभर एनआरसी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.आसाममध्ये एनआरसी मसुदा जाहीर झाला आणि तब्बल ४० लाख बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे या राज्यात राहत असल्याचे उघडकीस आले. आसामप्रमाणेच मुंबईसह देशाच्या विविध भागांत बेकायदेशीरपणे बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे एनआरसी लागू करावा या मागणीसाठी राज पुरोहित यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. नागरिकांची पडताळणी करून अवैधपणे वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशींना शोधून काढण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत तातडीने राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहीम हाती घेण्याची मागणी केली आहे. मुंबईसारख्या शहरांवर देशभरातून लोंढे आदळत आहेतच; पण बांगलादेशी घुसखोरांनीदेखील येथे बस्तान बसविले आहे, बेकायदेशीर वस्त्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे शहराच्या संसाधनांवर ताण पडत असून, कायदा-सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
‘आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा’ - राज पुरोहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:44 AM