शाळांमध्येही सीसीटीव्ही बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 02:55 AM2016-01-12T02:55:17+5:302016-01-12T02:55:17+5:30
एका ९वर्षीय मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने शाळांमध्येही सीसीटीव्ही बसवण्यात यावेत,
मुंबई : एका ९वर्षीय मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने शाळांमध्येही सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी सूचना राज्य सरकारला केली. त्याचप्रमाणे अशा घटना रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काय उपाययोजना आखल्या आहेत? अशी विचारणाही उच्च न्यायालयाने सरकारकडे केली आहे.
महिला संरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. सोमवारच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना काही दिवसांपूर्वी दादरच्या एका ९वर्षीय मुलीवर शाळेतच काम करणाऱ्या १९वर्षीय मुलाने स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याची घटना खंडपीठाच्या कानावर घातली.
‘ही घटना फार अस्वस्थ करणारी आहे. पालक त्यांच्या मुलांना शाळेत शाळा प्रशासन आणि शिक्षकांच्या विश्वासावर पाठवतात. आपल्या पाल्याचा ते सांभाळ करतील, असा त्यांना विश्वास असतो. असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत, यासाठी शिक्षण विभाग काय उपाययोजना आखणार आहे? प्रत्येक आठवड्याला शाळांना भेटी देणे आवश्यक आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.
‘शाळेच्या आतल्या आवारात सीसीटीव्ही बसवायला पाहिजेत. ज्या शाळांना सरकारी अनुदान मिळत आहे, त्या शाळांसाठी तरी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करा,’ अशी सूचना खंडपीठाने सरकारला करीत पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी ठेवली. (प्रतिनिधी)
शाळा प्रशासन कारवाईच्या भोवऱ्यात
मुंबई : दादर येथील शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी शाळाही कारवाईच्या भोवऱ्यात अडकली आहे.
मुलीची जबाबदारी असलेल्या शाळेच्या संबंधित शिक्षकांची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्यासंबंधीचे पत्र पोलिसांनी शाळेला बजावले आहे.
यामध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक होण्याची शक्यताही वरिष्ठांकडून वर्तविण्यात येत आहे.
त्या मुलीचे पालक पोहोचेपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांनी तिची देखरेख करणे गरजेचे होते. या प्रकरणी संबंधित शिक्षक आणि कर्मचारी वर्गाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबतचे लेखी पत्र सोमवारी शिवाजी पार्क पोलिसांनी शाळा प्रशासनाला पाठवले आहे. त्यामुळे शाळा प्रशासनावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या संबंधितांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्यांना यामध्ये अटक होण्याची शक्यताही वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीपार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक जगदाळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
शुक्रवारी शाळेतील वार्षिक समारंभ कार्यक्रम संपल्यानंतर ही पाचवीतील विद्यार्थिनी चुकून शाळेच्या आवारातच राहिली. विद्यार्थिनी एकटीच मागे राहिल्याचे लक्षात येताच संबंधित शिक्षिकेने तिच्या आईला फोन करून शाळेत बोलावून घेतले. आई येईपर्यंत ती काही वेळ शाळेच्या मैदानावर खेळली. मात्र तिचे कुटुंबीय परतेपर्यंत शाळेने तिची जबाबदारी घेणे गरजेचे होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ती सोमनाथ यादवच्या विकृत वासनेची बळी ठरली. सायन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या विद्यार्थिनीला सोमवारी डिस्जार्ज देण्यात आला आहे. मात्र अजूनही मानसिक धक्क्यातून ती बाहेर आलेली नाही.
पालकांनी घेतली शाळा प्रशासनाशी भेट
शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर धास्तावलेल्या पालकांनी शाळा प्रशासनासोबत सोमवारी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत शाळा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.