मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चा समावेश अतावश्यक सेवेत असताना देखील कोरोना योध्दा म्हणून त्यांना सुविधा मिळत नसल्याने बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना 10 लाखाची वैद्यकीय विमा सुविधा दिलेली असताना बीएसएनएल कर्मचाऱ्यांना अद्याप याबाबत सुविधा दिलेली नाही.
बीएसएनएल कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधेपोटी 25 दिवसांचे वेतन देण्याऐवजी 15 दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला विरोध केल्यानंतरही अद्याप हा निर्णय बदलण्यात आलेला नाही त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय सुविधा वाढवण्याऐवजी कमी केल्या जात आहेत. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना बीएसएनएल च्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनांना विश्वासघात घेतले गेले नाही त्यामुळे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे परिमंडळ खजिनदार गणेश हिंगे यांंनी याबाबत नाराजी व्यक्त केली
एकीकडे बीएसएनएल चे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना केंद्र सरकार कडून सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांसाठी दहा लाख रुपयांच्या कोरोना विमा योजनेचा लाभ त्वरित द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. बीएसएनएल कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या या विविध समस्यांबाबत ऑल युनियन्स अँन्ड असोसिएशन ऑफ बीएसएनएल चिंता व्यक्त केली असून या समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे. बीएसएनएल च्या 78 हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर देखील वेतनाची समस्या उद्भवणे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही समस्या कायमस्वरुपी निकालात निघेल व कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल असा निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.