एसटी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती लागू करा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 07:13 PM2020-06-26T19:13:19+5:302020-06-26T19:14:03+5:30
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेची मागणी
मुंबई : एसटी महामंडळाची आर्थिक बाजू खचली आहे. एसटीला कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इंधनावर सर्वाधिक खर्च होत आहे. त्यामुळे एसटीला वाचविण्यासाठी कर्मचारी वर्ग स्वतः स्वेच्छाने निवृत्त होण्यास तयार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती लागू करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेच्यावतीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.
एसटी महामंडळात एकूण एक लाख २ हजार कर्मचाऱ्यांपैकी जेष्ठ २७ हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी. कंत्राटी पद्धतीवरील १ हजार ६०० कर्मचाऱ्यांच्या जागी एसटी मधील कायम कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. त्यामुळे खर्चात मोठी बचत होऊन उर्वरित कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळेल. भविष्यात वेतनवाढ करता येईल, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने परब यांच्याकडे देण्यात आले. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे दररोज २२ कोटी इतके उत्पन्न बुडत आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर पूर्ण वेतन मिळत नाही. मागील तीन महिने वेतन उशिरा व कमी मिळत आहे. एसटी कर्मचाऱयांचे वेतन तुटपुंजे असल्याने कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या, शाळा कॉलेजमध्ये शिक्षणासाठीमुळे असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे इंधन आणि वेतनावर होणाऱ्या खर्चावर तत्काळ मर्यादा आणावी लागणार आहे. डिझेलवरील केंद्र व राज्य सरकारचा कर माफ केला पाहिजे. यासाठी महामंडळाकडून प्रयत्न व्हायला हवेत. याशिवाय २७ हजार जेष्ठ कर्मचाऱ्यांना फायदेशीर स्वेच्छानिवृत्ती योजना आणली. ते स्वेच्छेने निवृत्त झाले. वेतन खर्चात मोठी बचत होऊ शकेल. कंत्राटी पद्धतीवरील अंदाजे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांच्या जागेवर एसटीमधील अतिरिक्त कर्मचारी वर्ग वापरला पाहिजे. त्यामुळे मोठी बचत होणार आहे, अशी मागणी करण्यात आली. एसटीमध्ये साधारण एक लाख दोन हजार कर्मचारी सध्या कार्यरत असून त्यांच्या वेतनासाठी भविष्य निर्वाह निधीतला हिस्सा तसेच इतर रक्कम धरून एकूण २७० ते २८० कोटी महिन्याचा खर्च होतो.त्यापैकी २७ हजार जेष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एकूण रुपये शंभर कोटी खर्च होतात तसेच राहिलेल्या साधारण ७५ हजार कर्मचाऱ्यांवर साधारण १७० ते १८० कोटी खर्च होतो. ज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनावर मर्यादा आणाव्या लागतील. त्यांच्यासाठी चांगली फायदेशीर स्वेच्छानिवृत्ती योजना आणावी. कर्मचारी स्वेच्छेने निवृत्त झाले, तर इतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल व भविष्यात चांगली वेतनवाढ सुद्धा करता येईल. यापुढे अजून काही महिने वाहतूक सुरळीत होणार नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे काही प्रमाणात अतिरिक्त कर्मचारी वर्ग होणार असून त्यांचा वापर एसटीमध्ये अंदाजे १ हजार ६०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत असून त्यांच्यावर साधारण चार कोटींचा खर्च होत आहे. तो खर्च वाचविण्यासाठी एसटी मधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागी काम द्यावे. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काम मिळेल. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जो खर्च होतो त्याची बचत होऊन एसटीचे महिन्याला अंदाजे चार कोटी रुपयांची बचत होईल, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.