१ एप्रिलपासून ८५% भागावरील इशारा लागू
By admin | Published: May 10, 2016 03:02 AM2016-05-10T03:02:01+5:302016-05-10T03:02:01+5:30
सिगारेटच्या पाकिटावरील ८५ टक्के भागावर छापील चित्राद्वारे वैधानिक इशारा देणे बंधनकारक करण्यासंदर्भात मार्चमध्ये केंद्र सरकारने नियमामध्ये सुधारणा केली.
मुंबई : सिगारेटच्या पाकिटावरील ८५ टक्के भागावर छापील चित्राद्वारे वैधानिक इशारा देणे बंधनकारक करण्यासंदर्भात मार्चमध्ये केंद्र सरकारने नियमामध्ये सुधारणा केली. परंतु, हा नियम पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने १ एप्रिलनंतर उत्पादित करण्यात आलेल्या सगारेटसाठीच हा नियम लागू केला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले.
नियमांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आल्याने हा नियम त्या दिवसापासून लागू करता येऊ शकतो, असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांनी म्हटले. १ एप्रिलपर्यंत सिगारेट कंपन्या पाकिटाच्या ४० टक्के भागावर चित्राद्वारे वैधानिक इशारा छापत होत्या. दरम्यान, या कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेला आव्हान दिले आहे. या नियमामुळे कंपन्यांच्या अधिकारावर गदा येत आहे, असेही कंपन्यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने उन्हाळ्याच्या सुटीनंतर या याचिकेवरील सुनावणी ठेवत कंपन्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)