म्हाडाच्या ८१९ घरांसाठी १० नोव्हेंबरला सोडत, माहितीपुस्तिका संकेतस्थळावर, २२ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 04:50 AM2017-09-15T04:50:33+5:302017-09-15T04:51:00+5:30
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीची जाहिरात १५ सप्टेंबर रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये व म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीची जाहिरात १५ सप्टेंबर रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये व म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली येथील आठ सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवारनगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षानगर-सायन, सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), उन्नतनगर-गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाडनगर-मालवणी मालाड येथील एकूण २८१ सदनिकांचा समावेश आहे. उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल, तुंगा-पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली-कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांचा समावेश आहे,
अशी माहिती म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.
अत्यल्प उत्पन्न गटाकरिता १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती+पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) २५ हजार रुपयांपर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता २५,००१ ते ५०,००० रुपयांपर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता ५०,००१ ते ७५,००० रुपयांपर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे ७५,००१ रुपयांपर्यंत वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
आॅनलाइन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विनापरतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता १५,३३६ रुपये
प्रति अर्ज आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता २५,३३६ रुपये प्रति अर्ज आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता ५०,३३६ रुपये प्रति अर्ज आहे.
उच्च उत्पन्न गटाकरिता ७५,३३६ रक्कम प्रति अर्ज आकारली
जाणार आहे. यामध्ये आॅनलाइन अर्जापोटी प्रति अर्ज ३३६ रुपये (विनापरतावा) अर्ज शुल्काचा
समावेश आहे.
नोंदणी २१ आॅक्टोबरपर्यंत करता येणार
माहितीपुस्तिका व आॅनलाइन अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणी १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून २१ आॅक्टोबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत करता येईल.
नोंदणीकृत अर्जदारास नोंद माहितीमध्ये १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २२ आॅक्टोबर रोजीच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यास १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २२ आॅक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
बँकेत डीडी स्वीकृती १७ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत केली जाणार आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याद्वारे चलन निर्मिती १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून २३ आॅक्टोबरपर्यंतच्या रात्री १२ पर्यंत करता येणार आहे.
एनईएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी १७ सप्टेंबरच्या दुपारी २ वाजल्यापासून २४ आॅक्टोबरच्या रात्री १२ पर्यंत कालावधी असणार आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २४ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.