महापौरांच्या 'नो पार्कींग' गाडीवर कारवाई, पोलिसांनी 'ई-चलान' पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:21 PM2019-07-16T16:21:13+5:302019-07-16T16:26:49+5:30
महापौर विलेपार्ल्यात गेले असताना त्यांची गाडी नो पार्कींग झोनमध्ये पार्क करण्यात आली होती.
मुंबई - राजधानी मुंबई शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनीच नियम धाब्यावर बसवल्याचा प्रकार घडकीस आला होता. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी 'नो पार्किंग' बोर्डच्या अगदी समोर उभी होती. माध्यमांनी यावरुन महापालिका आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर, मुंबई ट्रॅफीक पोलीस प्रशासनाकडून महापौरांना ई-चलन पाठविण्यात आलं आहे.
महापौर विलेपार्ल्यात गेले असताना त्यांची गाडी नो पार्कींग झोनमध्ये पार्क करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना लागू असणारे नियम उच्चपदस्थांना लागू होत नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला होता. शनिवारी महाडेश्वर विलेपार्ल्यात होते. त्यावेळी त्यांची कार एका हॉटेलसमोरच्या रस्त्यावर उभी होती. विशेष म्हणजे त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड अगदी स्पष्ट दिसत होता. या भागातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. मात्र, तरीही महापौरांची कार या भागात उभी होती. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनांवर गेल्या आठवड्याभरापासून पालिकेनं मोठी कारवाई सुरू केली आहे. मात्र, असं असताना महापौरांचीच कार 'नो पार्किंग'मध्ये दिसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं. तसेच, महापौरांच्या गाडीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेत महापौरांना ई-चलन पाठवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे महापौरांनाही नियम दाखवत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांनाही आता दंड भरावा लागेल आणि दंड भरू असेही महापौरांनी यापूर्वीच सांगितले होते.
महापौर गेलेल्या भागात वाहनतळ नसल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. महापौरांची कार नो पार्किंग झोनमध्ये उभी करायला नको होती, असंदेखील अधिकारी म्हणाला. शनिवारी विलेपार्ल्यातील हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, असं महाडेश्वर म्हणाले. 'मी कारमधून उतरुन हॉटेलमध्ये गेलो. त्यावेळी चालकानं कार नेमकी कुठे उभी केली याची मला कल्पना नव्हती. पण कायद्यासमोर सगळे समान असतात आणि प्रत्येकानं नियम पाळायलायच हवेत, असं मला वाटतं, असेही महाडेश्वरांनी कबुली देत म्हटलं होते.