मास्क लावणे तुमच्या हातात! नागरिकांची नाराजी ओढवून घेण्याची यंत्रणांची मानसिकता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 07:00 AM2023-04-11T07:00:34+5:302023-04-11T07:05:36+5:30
देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालय यंत्रणा सज्ज आहे की नाही हे पाहण्यासाठी मॉक ड्रिल करायला सांगत आहेत.
मुंबई :
देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालय यंत्रणा सज्ज आहे की नाही हे पाहण्यासाठी मॉक ड्रिल करायला सांगत आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठका घेऊन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करीत आहेत. मुंबई महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगतोय. बूस्टर डोसच्या लसीकरणासाठी राज्याकडे महापालिका लस मागत आहेत. नागरिक बूस्टर डोस घेण्यासाठी पुढे येत आहे. एवढे सगळे घडत असताना, मात्र नागरिकांनी मास्क लावायचा की नाही हे ऐच्छिक ठेवले आहे. त्यामुळे आता मास्क लावायचा की नाही हा निर्णय नागरिकांना स्वतःलाच घ्यावा लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्याच्या आरोग्य विभागाने साथ रोग नियंत्रण कायदा अस्तित्वात असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच कोरोनाच्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात जे बेड राखीव ठेवले आहे त्याचे दर पूर्वीसारखेच कोरोना काळात ठरवून देण्यात आले होते. त्या पद्धतीचे शुल्क आकारावे असेही सांगितले आहे. तसेच रुग्णालयात डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठातांना कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी अनेक वेळा देशातील सर्वच वैद्यकीय तज्ज्ञांनी मास्क लावल्याने संसर्ग पसरण्याचा धोका कमी असल्याचे अनेक वेळा सांगितले आहे. वातावरणात संसर्ग पसरणे रोखण्यात मास्कची मोठी भूमिका आहे.
आरोग्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला मास्क बंधनकारक करून नागरिकांची नाराजी ओढवून घेण्याची मानसिकता सध्या कुणामध्येच नाही. राज्यात आणि शहरात सध्या विविध गोष्टी सुरू आहेत. राज्यात राजकारण पेटले आहे. राजकीय सभा, रॅली, दौरे सुरू आहेत. गर्दी होईल असे सर्व सण, कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्यामुळे मास्क बंधनकारक करावे या विषयावर कुणीही बोलत नाही.
सध्याच्या स्थितीत नागरिकांनी आरोग्याची चांगली सवय म्हणून मास्क घातले पाहिजे. विशेष करून गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला पाहिजे. तसेच ज्या व्यक्तींना सहव्याधी आहे त्यांनीही मास्क घातले पाहिजे. सोबतच आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी मास्क घातले पाहिजे.
- डॉ. राहुल पंडित,
सदस्य, राज्य कोरोना कृती दल
नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केलेले नाही. आजची स्थिती मास्क बंधनकारक करण्यासारखी नाही. परंतु गर्दीच्या ठिकणी मास्क घालावेत अशा मार्गदर्शक सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. लसीकरणासाठी राज्य सरकारकडे लसीची मागणी केली आहे.
- डॉ. मंगला गोमारे,
कार्यकारी आरोग्य अधिकारी
केरळ, पुद्दुचेरी, हरयाणा मास्क सक्तीकडे
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून काही राज्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये केरळ, पुद्दुचेरी आणि हरयाणा या शहरांचा समावेश आहे. पुद्दुचेरीत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणेही बंधनकारक केले.
केरळमध्ये ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. हरियाणात १०० पेक्षा अधिक नागरिक असतील त्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे.