शहरातील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक विभागासाठी एक नोडल इंजिनियर नियुक्त करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:52 PM2023-07-31T21:52:29+5:302023-07-31T21:52:45+5:30
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आदेश
Mangal Prabhat Lodha, Mumbai: मुंबईमध्ये गेले १० दिवस मुसळधार पाउस पडल्यामुळे विविध रस्त्यांवर खड्डे तयार झालेले आहेत. सदर खड्डे हे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाने पाउले उचलावीत यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. वेलरासु यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी मास्टिक तंत्रज्ञानाने खड्डे भरण्यासाठी तातडीने हॉट मास्टिंग मशीन उपलब्ध करून द्याव्यात. तसेच प्रत्येक विभागासाठी खड्डे बुजविण्यासाठी एक नोडल इंजिनियर नियुक्त करावा. सध्या खड्डे बुजविण्याच्या सुरु झालेल्या कामाचा वेग वाढवावा आणि या आठवड्या अखेरी पर्यंत मुंबईतील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत असे आदेश पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनास दिले.
मा. आयुक्त यांनी आज सर्व अधिकाऱ्यांची तपशीलवार बैठक घेऊन खड्डे बुजवावेत यासाठी अॅक्शन प्लन तयार केला आहे. मुंबईतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम परवा रात्री पासून सुरु झाले असून याची पाहणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल रात्री केली होती. भविष्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांबाबत नागरिकांसाठी एक व्हाट्स अॅप तक्रार क्रमांक आणि अॅप द्वारे तक्रार प्राप्त झाल्यावर २४ तासात खड्डे बुजविले जावेत असेही आदेश दिलेत. प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून मुंबईतील खड्डे एका आठवड्यात बुजविले जातील असा विश्वास मा. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.