Join us

OSD म्हणून देवेंद्र फडणवीसांची नेमणूक करा, नवाब मलिकांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 10:43 AM

भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राज्यातील महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचेही आरोप होत आहेत.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे माझ्यावर कारवाई होण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, या यंत्रणांसाठी ओएसडी म्हणून त्यांनी काम करावं, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

मुंबई - अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील शाब्दीक वार चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर, भाजपा नेते आणि नवाब मलिक यांच्यात सामना रंगला होता. नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी सबंध असल्याचा घणाघाती आरोप केला होता. त्यानंतर, मलिक यांनीच दाऊदच्या हस्तकाची जमीन खरेदी केल्याचा पुरावा फडणवीस यांनी समोर आणला. तेव्हापासून फडणवीस आणि मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता, मलिक यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राज्यातील महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचेही आरोप होत आहेत. आता, नवाब मलिक यांनी ट्विट करुन, देवेंद्र फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे माझ्यावर कारवाई होण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, या यंत्रणांसाठी ओएसडी म्हणून त्यांनी काम करावं, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

''महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय तपास यंत्रणांना माझ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुढाकार घेऊन मार्गदर्शन करत असल्याचं दिसून येतय. त्यामुळे, त्यांनी स्वत:ची ओएसडी म्हणून नियुक्ती करावी, त्यांना मुख्यमंत्रीपदी असतानाचा ओएसडी नियुक्तीचा चांगला अनुभव आहे,'' असे खोचक ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. तसेच, भाजप नेते किरीट सोमय्यांना प्रवक्ता बनवा, असेही त्यांनी म्हटलंय.   

फडणवीसांवर यापूर्वीही साधला निशाणा

"शरद पवार यांचे राजकारण संपले आहे असे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस टीका करतात, त्यावेळी चमत्कार घडतो. त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू," असे म्हणत मलिक यांनी यापूर्वी फडणवीसांवर टीका केली होती. फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाबाबतच्या आणि खासदार संख्येसंदर्भातील केलेल्या विधानानंतर मलिक यांनी प्रत्युत्तर दिले होते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनवाब मलिकनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोराष्ट्रवादी काँग्रेस