Join us

कुरार भुयारी मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई -कुरार भुयारी मार्गाच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. निर्धारित वेळेत काम करण्याकरिता सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई -कुरार भुयारी मार्गाच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. निर्धारित वेळेत काम करण्याकरिता सर्व परवानग्या विनाविलंब मिळणे आवश्यक आहे; तसेच हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकरिता झालेले काम व प्रस्तावित काम यांची आढावा बैठक आमदार सुनील प्रभू यांच्या मागणीनुसार दृक‌्श्राव्य माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

भुयारी मार्ग जानेवारी २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती ‘एमएमआरडीए’मार्फत देण्यात आली असता हा मार्ग डिसेंबर २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला झाल्यास नागरिकांना नवीन वर्षाची भेट देण्यात येईल, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली.

या कामाकरिता नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या; तसेच प्रत्येक दोन महिन्यांनी कामाचा आढावा सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी पावसाळ्यातही हे काम सुरू ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने परवानगी दिली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त वाहतूक विभाग यांनी दिली. या भुयारी मार्गाचे काम पाच टप्प्यांत सुरू आहे. दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरअखेरपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए सोनिया सेठी यांनी दिली.

कांदिवली लोखंडवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार !

कांदिवली लोखंडवाला ते दिंडोशी रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसित करण्याच्या दृष्टीने वन विभागातून जाणाऱ्या भागात वन्य जैवविविधतेला धक्का न लावता कशा पद्धतीने विकासकाम करण्यात येईल याबाबत निविदापूर्व चाचणी सुरू असून, येत्या तीन महिन्यांत वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासह निविदा प्रक्रिया पूर्ण होतील व पुढील कामाला सुरुवात होऊन लवकरच हा पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांनी या बैठकीदरम्यान दिली.

दृक‌्श्राव्य माध्यमातून आयोजित बैठकीला अतिरिक्त पोलीस आयुक्त वाहतूक, अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए सोनिया सेठी, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, प्रमुख अभियंता विकास नियोजन विनोद चिठोरे, उपप्रमुख अभियंता रस्ते विनोद कामत, मुंबई मेट्रो प्राधिकरण - मार्गिका क्र. ७ व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

--------------------------------------------