Join us

स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी तज्ज्ञांचे पॅनल नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:06 AM

एल्गार परिषद; उच्च न्यायालयाचे जे. जे. रुग्णालयाला निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद ...

एल्गार परिषद; उच्च न्यायालयाचे जे. जे. रुग्णालयाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले स्टॅन स्वामी यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅनल नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. तर दुसरीकडे सहआरोपी हनी बाबू यांना कोरोना व म्युकरमायकाेसिसवर उपचार करण्याकरिता ब्रीच कॅण्डी येथे हलविण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

स्टॅन स्वामी यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत दिले होते. राज्य सरकारने त्यांचे वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करत त्यांची प्रकृती ठीक असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अन्य तक्रारींबाबत या अहवालात काहीच नमूद नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅनल नेमून नव्याने वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

* हनी बाबू यांना ‘ब्रीच कँडी’ उपचाराची परवानगी

हनी बाबू यांच्यावर जीटी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान त्यांना म्युकरमायकाेसिसही झाला. योग्य प्रकारे उपचार करण्यात येत नसल्याची तक्रार त्यांचे वकील युग चौधरी यांनी न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे केली. त्यांनतर न्यायालयाने हनी बाबू यांना ऑनलाइन पद्धतीने न्यायालयात उपस्थित ठेवण्याचे आदेश रुग्णालयाला दिले. न्यायालयात हजर राहिल्यानंतर न्यायालयाने योग्य उपचार करण्यात येत आहेत का, अशी विचारणा केली. त्यावर हनी बाबू यांनी सकाळपासून योग्य प्रकारे उपचार केले असून प्रकृतीत थोडी सुधारणा असल्याचे सांगितले. मात्र, हनी बाबू यांच्या पत्नीने खासगी रुग्णालयातच उपचाराची परवानगी मागितली. बिल भरण्याचीही तयारी दाखवली. त्यावर एनआयएच्या वकिलांनी आक्षेप घेतला. या लोकांचे अनुकरण उर्वरित कैदी करतील आणि ते ही खासगी रुग्णालयातच उपचार घेण्याचा आग्रह करतील, असे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

घरच्यांना मानसिक समाधान मिळू द्या, असे म्हणत न्यायालयाने हनी बाबू यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिली. मात्र, त्याचे बिल कुटुंबीयांनाच भरण्याचे निर्देश दिले.

..................................