खारफुटीच्या संरक्षणासह संवर्धनाकरिता विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 04:27 PM2020-12-13T16:27:59+5:302020-12-13T16:28:24+5:30
Appoint a special vigilance team for conservation : विकासाच्या नावाखाली खारफुटीची कत्तल केली जात आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात विकासाच्या नावाखाली खारफुटीची कत्तल केली जात आहे. बहुतांश ठिकाणी काही प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट होत असून, काही ठिकाणी खारफुटी तोडून झोपड्या उभ्या केल्या जात आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. परिणामी मुंबईच्या परिसंस्थेमधील महत्त्वाचा घटक असलेल्या खारफुटीचा गळा घोटला जात असून, सबंधितांवर कारवाई करण्याबाबत प्रशासकीय हलगर्जीपण बाळगला जातो. परिणामी अशा प्रकरणात सरकारने कारवाईचे अधिकार मुंबई महापालिकेला द्यावे, अशा आशायाचा सूर लगावला जात आहे. खारफुटीच्या संरक्षणासाठी विशेष दक्षता पथक नेमा, अशी मागणी केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग, खारफुटीचा अधिसुचित भाग समाविष्ट आहे. हे क्षेत्र मुंबईला लाभलेली पर्यावरणपूरक नैसर्गिक वनसंपदा आहे. खारफुटीची जंगले संरक्षक असून, मनुष्यवस्त्यांच्या संरक्षणाचे मुख्य काम करतात. खारफुटींमध्ये त्सुनामीसारखी वादळे थोपविण्याची क्षमता आहे. याद्वारे सागरी जैवविवधतेचे संवर्धन होते. जलचर, पाणथळ पक्षी, सुक्ष्म जीव खारफुटीच्या आश्रयाला असतात. मात्र आर्थिक हव्यासापोटी खारफुटीचे जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मुंबईतल्या वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. परिणामी खारफुटीचे संवर्धन व्हावे यासाठी महापालिकेने खारफुटीच्या संरक्षणासह संवर्धनाकरिता खारफुटीच्या क्षेत्रात विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करावी. आणि खारफुटीची झाडे नष्ट करत असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे म्हणणे नगरसेवक विरेंद्र चौधरी यांनी मांडले आहे. याकरिता पालिकाने प्रयत्न करावेत, अशा आशायाच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सभागृहात अशा आशायाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. चौधरी यांनी या प्रस्तावात अशा आशायाच्या मागण्या केल्या असून, खारफुटीच्या संरक्षणासाठी सरकारी यंत्रणा असली तरी तिवरांच्या क्षेत्रात विशेष दक्षता पथकाची मागणी करण्यात आली आहे.
पुरापासून मुंबईचा बचाव करण्यासाठी इथली खारफुटी प्रचंड महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जन शोषण्याचेही ती काम करते. विकास प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट होण्याची मोठी भीती आहेच. अशा परिस्थितीत एमएमआर क्षेत्रातील विकासादरम्यान खारफुटीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. भोवतालच्या जैवविविधतेकडे आपण कानाडोळा केला तर त्याची किंमत आपल्या भावी पिढीला मोजावी लागेल. आता मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये पूर येणारच हे गृहितच झाले आहे. आपण आताच कृती केली नाही तर नंतर खूप उशीर होईल. खारफुटी नष्ट झालेली असेल तेव्हा या घरांना, इमारतींना पाण्यात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.