खारफुटीच्या संरक्षणासह संवर्धनाकरिता विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:14+5:302020-12-14T04:24:14+5:30

पर्यावरणप्रेमी : मुंबई पालिकेच्या सभागृहात नगरसेकाने मांडला प्रस्ताव लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात विकासाच्या नावाखाली ...

Appoint a special vigilance team for conservation with protection from thorns | खारफुटीच्या संरक्षणासह संवर्धनाकरिता विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करा

खारफुटीच्या संरक्षणासह संवर्धनाकरिता विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करा

Next

पर्यावरणप्रेमी : मुंबई पालिकेच्या सभागृहात नगरसेकाने मांडला प्रस्ताव

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात विकासाच्या नावाखाली खारफुटीची कत्तल केली जात आहे. बहुतांश ठिकाणी काही प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट होत असून, काही ठिकाणी खारफुटी तोडून झोपड्या उभ्या केल्या जात आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. परिणामी, मुंबईच्या परिसंस्थेमधील महत्त्वाचा घटक असलेल्या खारफुटीचा गळा घोटला जात असून, संबंधितांवर कारवाई करण्याबाबत प्रशासकीय हलगर्जीपण बाळगला जातो. परिणामी, अशा प्रकरणात सरकारने कारवाईचे अधिकार मुंबई महापालिकेला द्यावे, अशा आशयाचा सूर पर्यावरणप्रेमींमध्ये आहे. खारफुटीच्या संरक्षणासाठी विशेष दक्षता पथक नेमा, अशी मागणी केली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग, खारफुटीचा अधिसूचित भाग समाविष्ट आहे. हे क्षेत्र मुंबईला लाभलेली पर्यावरणपूरक नैसर्गिक वनसंपदा आहे. खारफुटीची जंगले संरक्षक असून, मनुष्यवस्त्यांच्या संरक्षणाचे मुख्य काम करतात. खारफुटींमध्ये त्सुनामीसारखी वादळे थोपविण्याची क्षमता आहे. याद्वारे सागरी जैवविवधतेचे संवर्धन होते. जलचर, पाणथळ पक्षी, सूक्ष्म जीव खारफुटीच्या आश्रयाला असतात. मात्र, आर्थिक हव्यासापोटी खारफुटीचे जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मुंबईतल्या वनसंपदेला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, खारफुटीचे संवर्धन व्हावे, यासाठी महापालिकेने खारफुटीच्या संरक्षणासह संवर्धनाकरिता खारफुटीच्या क्षेत्रात विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करावी आणि खारफुटीची झाडे नष्ट करत असलेल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असे म्हणणे नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांनी मांडले. याकरिता पालिकाने प्रयत्न करावेत, अशा आशयाच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सभागृहात अशा आशयाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. चौधरी यांनी या प्रस्तावात अशा आशयाच्या मागण्या केल्या असून, खारफुटीच्या संरक्षणासाठी सरकारी यंत्रणा असली, तरी तिवरांच्या क्षेत्रात विशेष दक्षता पथकाची मागणी करण्यात आली आहे.

पुरापासून मुंबईचा बचाव करण्यासाठी इथली खारफुटी प्रचंड महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर, कार्बन उत्सर्जन शोषण्याचेही ती काम करते. विकास प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट होण्याची मोठी भीती आहेच. अशा परिस्थितीत एमएमआर क्षेत्रातील विकासादरम्यान खारफुटीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. खारफुटी नष्ट झाल्यास मान्सूनमध्ये पूर येऊन घरांना, इमारतींना पाण्यात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

Web Title: Appoint a special vigilance team for conservation with protection from thorns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.