Join us

रस्त्यावरील भेगा दुरुस्तीसाठी विशेष पथक नेमा; मुंबई आयआयटीचा महापालिकेला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 09:48 IST

रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर काँक्रीटसारख्या पर्यायांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंबई आयआयटीने  दिला आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर काँक्रीटसारख्या पर्यायांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंबई आयआयटीने  दिला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, याबाबत उपाययोजनाही सुचवल्या आहेत.

पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयु्क्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेला रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्तापूर्ण होण्यासाठी पालिका अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे आहे.  काँक्रीट रस्त्याचा आराखडा, तंत्रज्ञान, गुणवत्ता चाचण्या, हवामान यांसह काँक्रीट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे, उपलब्ध उपाययोजना या विषयी अभियंत्यांनी कालानुरूप प्रशिक्षण घेऊन अद्ययावत राहिले पाहिजे, असा सूर कार्यशाळेत उमटला. 

आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव यांनी,  सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या आराखड्याच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाबाबतची माहिती आणि निकष यांची मांडणी केली.  

अभियंत्यांचा सहभाग-

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव, प्रा. पी. वेदगिरी, प्रा. दीपांकर चौधरी, उप आयुक्त उल्हास महाले, प्रमुख अभियंता मनीषकुमार पटेल तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. १५५ हून अधिक अभियंते सल्लागार कंपन्यांच्या अभियंत्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाआयआयटी मुंबई