मुंबई विद्यापीठाकडून अपात्र प्राचार्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 05:15 AM2019-05-04T05:15:16+5:302019-05-04T05:15:30+5:30

३० वर्षांपेक्षा अधिक काळ बजावली सेवा; निवड रद्द झाल्यास दीड कोटीहून अधिकचा भुर्दंड

Appointing ineligible principals from the University of Mumbai | मुंबई विद्यापीठाकडून अपात्र प्राचार्यांची नियुक्ती

मुंबई विद्यापीठाकडून अपात्र प्राचार्यांची नियुक्ती

Next

सीमा महांगडे

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकषात बसत नसतानाही नियुक्त केलेल्या प्राचार्यांनी तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. यासंदर्भात चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानंतर नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यामुळे आता प्राचार्यांना एवढ्या वर्षांचे वेतन व अन्य लाभांसाठीची मिळालेली दीड कोटीहून अधिकची रक्कम परत करावी लागेल. सध्या विद्यापीठानेच या प्राचार्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यामुळे विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह आहे.

भावना वैद्य असे या प्राचार्यांचे नाव असून मुंबईतील सराफ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी १९८६ साली त्यांची नियुक्ती झाली. ती निकषांत बसत नसल्याने पहिल्यांदा ३ वर्षे, त्यानंतर ५ वर्षे अशी दोनदा सशर्त मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, त्यांना पात्रतेसाठी उच्च शिक्षणाची पूर्तता करून घेणे आवश्यक असूनही त्यांनी ते केले नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. २०१३ साली त्यांनी विद्यापीठाला प्रस्ताव देऊन नियुक्ती कायम केली. यासंदर्भात तक्रारी विषय व्यवस्थापन परिषदेत आल्यानंतर कुऱ्हाडे समिती स्थापन झाली.

समितीने नियुक्ती नियमांच्या विरोधात असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१८ रोजी वैद्य यांचा प्राचार्यपदाचा कालावधी संपण्याआधी एक दिवस म्हणजे ३० डिसेंबर २०१८ रोजी विद्यापीठाने त्यांची नियुक्ती रद्द केली. यामुळे त्यांना आतापर्यंत मिळालेले वेतन, अन्य लाभ उच्च शिक्षणाच्या सहसंचालकांना परत करावे लागतील. ती रक्कम दीड कोटींहून अधिक आहे.

दरम्यान, आता वैद्य यांची बाजू ऐकून घेण्यासाठी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. मात्र, दोन सुनावण्या होऊनही काही निष्पन्न झाले नसल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांनी दिली. नियुक्ती निकषात बसत नसूनही कायम कशी ठेवली, यावर नुकत्याच झालेल्या सिनेट बैठकीत युवासेना सदस्या शीतल शेठ-देवरुखकर, प्रदीप सावंत यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता.
‘कारवाई होणे गरजेचे’

सिनेट सदस्या शीतल शेठ-देवरुखकर यांनी सांगितले की, पात्रता नसलेल्या, अटी-नियमांची पूर्तता न करणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती प्राचार्यपदी करणे म्हणजे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान आहे. अशा चुकीच्या नियुक्त्यांना मान्यता देणाºया मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई व्हायला हवी.

‘प्रक्रिया सुरू असल्याने भाष्य करणे अयोग्य’
मुंबई विद्यापीठ प्रशासनाशी यासंदर्भात संपर्क साधला असता या प्रकरणावर सध्या प्रक्रिया सुरू असून आता कोणतेही भाष्य करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर भावना वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता मी माझी बाजू अधिकृत प्रशासनाकडे मांडली असून दुसरीकडे प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Appointing ineligible principals from the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.